यशवंतराव चव्हाण सेंटरच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे दरवर्षी महाविद्यालयीन नियतकालीक (College Souvenir) स्पर्धा आयोजित केली जाते. साहित्य क्षेत्रात नवनवीन सकारात्मक प्रवाह येऊन राज्यातील युवांमध्ये साहित्याबाबत आस्था व पुरोगामी विचारांची पेरणी व्हावी हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या विचारांचे आणि भावनांचे प्रतिबिंब असंख्य महाविद्यालयीन नियतकालीकांमध्ये पडलेले पहावयास मिळते. या नियतकालीकांमध्ये आपले लेख, कविता, लिहणा-या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे साहित्यिक घडत असतात. युवांना आपले मत मांडण्याची संधी देताना त्यांच्यातील कलागुणांना वाव देणा-या नियतकालीकांचे महत्व लक्षात घेऊन राज्यातील उत्कृष्ट नियतकालीकांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्रातील एकमेव उपक्रम आहे.
स्पर्धेतील प्रथम विजेत्या क्रमांकाकरीता रु. १०,०००/- चा धनादेश, द्वितीय क्रमांकाकरीता रु. ७०००/-चा धनादेश, तृतीय क्रमांकाकरीता रु. ५,०००/- चा धनादेश, विशेष पारितोषिक (विद्यापीठ निहाय संख्या : 12 ) रु ३,०००/- प्रत्येकी, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र असे बक्षिसांचे स्वरुप आहे. या स्पर्धेमध्ये सादर केलेल्या नियतकालीकांचे यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालयामध्ये जतन करुन ते विद्यार्थी व अभ्यासकांसाठी उपलब्ध केले जाते.