यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने स्त्री-शक्तीला सलाम करण्यासाठी २०२२ सालापासून ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ देण्यात येणार आहे. कृषी, साहित्य, सामाजिक कार्य, क्रीडा प्रशिक्षण, उद्योग आणि पत्रकारिता या क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो.

यशस्विनी कृषी सन्मान

‘यशस्विनी कृषी सन्मान पुरस्कार' हा कृषी क्षेत्राशी संबंधित पुरस्कार आहे. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, शेतीत अभिनव प्रयोग करणाऱ्या एका शेतकरी महिलेची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. या पुरस्काराच्या माध्यमातून शेती क्षेत्रातील महिलांचे अमूल्य योगदान अधिक ठळकपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

यशस्विनी साहित्य सन्मान

साहित्य क्षेत्रासाठी दिला जाणारा पुरस्कार म्हणजे ‘यशस्विनी साहित्य सन्मान पुरस्कार’. साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी काम करणाऱ्या महिलेस हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या एका महिलेला दरवर्षी पुरस्कार देऊन त्यांना दर्जेदार साहित्यनिर्मितीसाठी प्रेरीत करण्याचा प्रयत्न यानिमित्ताने चव्हाण सेंटर करत आहे.

यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान

क्रीडा क्षेत्रात दर्जेदार खेळाडू घडविणाऱ्या एका महिलेस ‘यशस्विनी क्रीडा प्रशिक्षक सन्मान पुरस्कारा’ ने गौरविण्यात येते. क्रीडा क्षेत्रात महिला प्रशिक्षकांनी आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. महिला प्रशिक्षकांची ही ओळख आणखी गडद व्हावी या उद्देशाने दरवर्षी एका महिलेला हा पुरस्कार देण्यात येतो.

यशस्विनी उद्योजिका सन्मान

औद्योगिक क्षेत्रात उत्तम कामगिरी करणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी उद्योजिका सन्मान पुरस्कार’ देण्यात येतो. महिलांनी औद्योगिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करुन देशाचे नाव उंचावले आहे. याशिवाय अर्थव्यवस्थेला देखील मोलाचा हातभार लावला आहे. त्यांच्या या कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी एका महिलेला हा पुरस्कार देण्यात येतो.

यशस्विनी सामाजिक सन्मान

सामाजिक क्षेत्रात विधायक व रचनात्मक कार्य करुन महाराष्ट्राच्या विकासात भर टाकणाऱ्या महिलेस ‘यशस्विनी सामाजिक सन्मान पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी अनेक महिला कार्यकर्त्या अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. त्यांच्या या कार्यास बळ देण्यासाठी दरवर्षी एका महिलेला या पुरस्काराने गौरविण्यात येते.

यशस्विनी पत्रकारिता सन्मान

पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला पत्रकारास ‘यशस्विनी पत्रकारिता सन्मान पुरस्कार’ देण्यात येतो. दरवर्षी जनसामान्यांचे प्रश्न, त्यांचा आवाज आपल्या लेखणीतून बुलंद करणाऱ्या एका महिला पत्रकाराची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

या पुरस्कारासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतात. त्यानंतर तज्ज्ञ निवडसमितीच्या माध्यमातून पुरस्कारार्थींची निवड करण्यात येते. रुपये २१ हजार, सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.