अभिसरण

विविधतेने आणि संपन्नतेने नटलेल्या महाराष्ट्रातील युवांना ओळख करुन देण्याचा कार्यक्रम म्हणजे हा उपक्रम होय. आपापला भूभाग सोडून या महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यात जावून तेथील माहितीचेच नव्हे तर तेथील आचार, विचार, भाषा, आवडी-निवडी, सवयी, व्यवहार, संस्कृती यांचे आदान प्रदान करण्याची ही एक जाणीव प्रक्रिया आहे

संकल्पना

महाराष्ट्र हा विविधतेने आणि संपन्नतेने नटलेला मुलुख आहे. येथील चांद्यापासुन बांद्यापर्यंत प्रत्येक भूभागाचे वेगळेपण आहे. बोलीभाषा, बोलण्याची लकब, पेहराव, खाद्यसंस्कृती, आदरातिथ्य, पारंपरिक शेती पद्धत, पारंपरिक व्यवसाय व उद्योगधंदे,येथील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, राजकिय आणि ऎतेहासिक पार्श्वभूमी ते अगदी येथील निसर्गामध्येही हे वेगळेपण जाणवते. ही भूमी संतांची अन् सुधारकांची, शुरांची अन् वीरांची, कलावंतांची तशीच साहित्यिकांची, कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची, उद्योजकांची आणि राज्यकर्त्यांची आहे.

मराठी मने या मराठी मातीशी जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधुन ‘नव महाराष्ट्र युवा अभियाना’ने तरुण देशाच्या तरुण राज्यातील युवांवर लक्ष केंद्रित केले आणि अभिसरण हा अनोखा उपक्रम सुरु केला.