स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्राला तसेच देशाला फक्त कायदा व सुव्यवस्था या स्वरूपाच्या प्रशासनाची गरज नसून, विकासाभिमुख प्रशासनाची गरज आहे. हे ओळखणाऱ्या द्रष्ट्या व्यक्तींमध्ये यशवंतराव अग्रगण्य होते. विकासाभिमुख प्रशासनाची गरज ओळखण्यामध्ये यशवंतरावांचे जसे द्रष्टेपण होते तसेच ते महाराष्ट्र राज्यामध्ये त्याची यशस्वी अंमलबजावणी करण्यात देखील होते. प्रशासनाची एक वेगळीच छाप दाखवून, त्याचा आदर्श वस्तुपाठ यशवंतरावांनी देशपातळीवर घालून दिला होता. 'सामान्य माणूस' हा त्यांच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक नीतीचा केंद्रबिंदू होता. त्यांनी देशपातळीवर महाराष्ट्र राज्याचा ‘एक प्रागतिक राज्य’ असा लौकीक निर्माण केला.
रत्नागिरी, दि.२८ - यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र - रत्नागिरी यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत ‘ज्येष्ठ नागरिक कायदा २००७’ या विषयावर ॲड.प्रमोद ढोकळे यांनी तर ‘आनंदी जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर माधवबाग सीएसआर हेड डॉ.मिलिंद सरदार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी सुमती जांभेकर, फेस्कॉमचे सदस्य उस्मान बांगे, माजी तहसीलदार मारुती अंब्रे, चव्हाण सेंटरच्या ज्येष्ठ नागरिक दिव्यांग विभागाच्या प्रमुख दिपिका शेरखाने, जिल्हा केंद्र रत्नागिरीचे सचिव अभिजीत खानविलकर, सह्याद्री शिक्षण संस्थेचे महाडिक सर उपस्थित होते.
शहरातील शंभरहून अधिक ज्येष्ठ नागरिक या कार्यशाळेसाठी उपस्थित होते. कार्यशाळेतील मुख्य मार्गदर्शनानंतर चर्चासत्र व प्रश्नोत्तरे झाली. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी देखील आपापले अनुभव मांडले. यावेळी वय वर्ष ८२ असलेल्या डॉक्टर साठे यांचा स्विमिंगमध्ये यशस्वी सहभाग नोंदवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मनीषा खिल्लारे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या, शिक्षण विकास मंच आयोजित चौदावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद आज पार पडली. 'नवीन शैक्षणिक धोरण, भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण' या विषयावरील आयोजित शिक्षण परिषदेत चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे यांनी उपस्थित शिक्षकांशी संवाद साधला. या परिषदेत ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत सुनीलकुमार लवटे यांनी देखील उपस्थित राहून आपले विचार व्यक्त केले.
या एकदिवसीय परिषदेमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी आपले संविधान या विषयावरील 'टॉक शो'चे उत्तम सादरीकरण केले. तसेच 'नवीन शैक्षणिक धोरण, भारतीय संविधान आणि शालेय शिक्षण' या विषयावर डॉ. कमलादेवी आवटे यांनी विचार व्यक्त केले. 'संविधानातील मूल्य विचार व शालेय शिक्षण' या विषयावरील चर्चेत राही श्रुती गणेश, ऐनुल अत्तार, बसंती रॉय यांनी सहभाग घेत मार्गदर्शन केले.
'आपले आयकार्ड' या विषयाच्या अनुषंगाने श्रीरंजन आवटे यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व अधोरेखित केले. महेंद्र गणपुले यांनी सूत्रसंचालन केले.
याप्रसंगी प्रथम संस्थेच्या फरीदा लांबे, दत्ता बाळसराफ, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सीईओ दीप्ती नाखले, शिक्षण विभागाचे प्रमुख योगेश कुदळे, शिक्षण विकास मंचची टीम, राज्यभरातील शिक्षक व शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंबई - 'यशवंतराव चव्हाण सेंटर' निर्मित आणि 'डिजिटिकल वर्क्स' प्रकाशित 'नवोपक्रमांची नवलनगरी' या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा चव्हाण सेंटर, मुंबई येथे उत्साहात पार पडला. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रियाताई सुळे आणि ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत सुनीलकुमार लवटे हे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
राज्याचे माजी शिक्षण संचालक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे हे या पुस्तकाचे मुख्य मार्गदर्शक आहेत. शिक्षण विकास मंचच्या कोअर कमिटीचे सदस्य तथा राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता आणि उपाध्यक्ष महेंद्र गणपुले आणि मेंदू व शिक्षण अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांच्या अनुभवी संकलनातून हे पुस्तक साकारले आहे.
शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या बॅचच्या शिक्षकांनी अतिशय कल्पकतेने नवोप्रक्रम राबवलेले सर्वच उपक्रम नवीन राष्ट्रीय धोरण २०२० मधील तरतुदींशी सुसंगत आहेत. हे उपक्रम घेण्यामागची प्रेरणा समजावी आणि इतर शिक्षक आणि शिक्षणक्षेत्रातील कार्यकर्त्यांना अशाच प्रकारचे काम करण्याची प्रेरणा मिळावी ही या पुस्तकाची निर्मिती करण्यामागची संकल्पना आहे, अशी माहिती प्रकाशकांनी दिली. त्याचबरोबर हे पुस्तक सर्वांनी वाचावे, असे आवाहन करण्यात आले.
विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळीस संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी , शिवनेरीला येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचं सारं राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होतं. त्याला साजेसं ते बोलले, "संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात."
नवमहाराष्ट्राचे शिल्पकार तथा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री मा. यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात कृषी-औद्योगिक समाजाच्या विकासाची पायाभरणी केली. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर, राज्याची धुरा सांभाळताना पंचायत राजची त्रिस्तरीय रचना त्यांनी अमलात आणली व त्यातून समाजात राजकीय नेतृत्व घडविण्याची एक कार्यशाळाच निर्माण केली, आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी आणले. हाच विचारांचा आणि कृतीचा वारसा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या माध्यमातून चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यशवंतराव चव्हाण, सेंटर मुंबईची कार्यप्रणाली सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, प्राविण्य आणि विश्वासार्हता या मुल्यांवर आधारित आहे.
‘विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. ‘आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे,’ ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण, महिला, आरोग्य, युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई उत्प्रेरक (catalyst) म्हणून कार्यरत आहे. चव्हाण सेंटरच्या या सामाजिक कार्यात समाजातील प्रत्येक घटकांनी सहभागी व्हावे, अशी आमची इच्छा आहे.
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी आपल्या ६० वर्षांहून अधिकच्या सार्वजनिक आयुष्यात शेती, औद्योगिक विकास, सामाजिक न्याय, युवक-कल्याण,शिक्षण आणि महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांमध्ये क्रांतीकारक असे काम केले आहे. त्यांच्या या लोकोत्तर कार्याला सलाम करण्यासाठी, 'यशवंतराव चव्हाण सेंटर' मुंबई च्या वतीने शेती, साहित्य आणि शिक्षण या क्षेत्रांसाठी ‘शरद पवार इनस्पायर फेलोशीप’ सुरु करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील होतकरु, गुणवंत आणि नव्याने काही करु पाहणाऱ्या तरुण-तरुणींना संधीचे नवे आकाश खुले करुन देण्याचा हा प्रयत्न आहे.
आव्हान पेलण्याची जिद्द बाळगणारे तरुण-तरुणी या फेलोशीपच्या माध्यमातून आपल्या स्वप्नांना आकार देऊ शकतील व त्यातून भविष्यातील समृद्ध व सुसंस्कृत महाराष्ट्र घडण्यासाठी त्यांचे योगदान मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो.
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण म्हणजे मराठी मनांचा मानबिंदू. संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. महाराष्ट्राच्या कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, महाराष्ट्रात सहकाराचे जाळे विणणारा आणि पंचायत राज्याच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणारा हा द्रष्टा नेता. देशाच्या राजकारणामध्ये देखील जेव्हा जेव्हा कठीण परिस्थिती उद्भवली, तेव्हा तेव्हा संबंधित खाती सक्षमपणे संभाळून देशाच्या स्थैर्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा आणि राष्ट्रीय राजकारणाला दिशा देणारा नेता.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळ्याचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. या सोहळ्यात लग्नाचा खर्च, वधूचे सौभाग्य लेणे, संसारोपयोगी साहित्य आणि अन्य काही उपयुक्त गोष्टींचा खर्च चव्हाण सेंटरच्या वतीने करण्यात येतो. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांगांचा या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळतो.
चव्हाण सेंटर आयोजित पहिला सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी ३ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आला होता.यामध्ये बारा जोडप्यांचा विवाह सोहळा अत्यंत थाटामाटात रंगला होता.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात आज मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके होते. तर २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले आणि २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले . मुलगी जन्माला येण्याचा हक्कच हिरावून घेतला जात असल्याची स्थिती आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जात आहेत, ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत. या संदर्भात सर्वसामान्यांच्या मनात जनजागृती करण्याकरिता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून आयोजित स्त्री भ्रूणहत्येविरोधात 'जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा...' हा उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.