यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी ‘तांदूळ महोत्सव’ भरविण्यात येतो. महाराष्ट्रातील विविध भागात तांदळाची अतिशय दर्जेदार अशी वाणे आढळतात. त्यांची चव, सुगंध आणि गुण अद्भुत आहेत. आपल्या महाराष्ट्राच्या या समृद्ध कृषीपरंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच शहरी ग्राहकांना ‘तांदूळ’ थेट शेतकऱ्यांकडून खरेदी करता यावा हा या 'तांदूळ महोत्सवा'चा उद्देश आहे. तसेच उत्पादक आणि ग्राहकांतील हा थेट संवाद वाढून या वाणांची भविष्यात मागणी वाढेल. परिणामी त्याचा दीर्घकालीन लाभ शेतकऱ्यांना होईल, अशी यामागची भूमिका आहे.

या महोत्सवात रायगड-ठाण्यातील वाडा कोलम, मावळ मुळशीचा इंद्रायणी, आंबेमोहोर, आजऱ्याचा घनसाळ, चंद्रपूर विदर्भाचा श्रीराम कोलम, अकोले, नाशिक येथील आदिवासी शेतकऱ्यांनी पिकविलेला ब्लॅक, रेड, ब्राउन राईस तसेच सेंद्रिय निळाभात आदी पारंपरिक तसेच संशोधित तांदळाचे वाण उपलब्ध असतात.

या महोत्सवात राज्यभरातील शेतकरी व शेतकरी उत्पादक गट आपला तांदूळ थेट शहरी ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देतात.

आपल्या राज्याचे समृद्ध असे कृषी वैविध्य एकाच ठिकाणी पहायला मिळाल्याचे समाधान या महोत्सवास भेट देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस होते.