कृष्णाई उळेकर
युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार
2024
महाराष्ट्रातील प्रत्येक गावातून, जिल्ह्यातून ते शहरातल्या पंचतारांकित हॉटेल मध्ये प्रबोधन करणारा एक आवाज घुमतोय, त्या आवाजाचे नाव आहे कृष्णाई उळेकर ! अवघ्या वयाच्या दहाव्या वर्षी संत एकनाथांचे भारुड रंगमंचावर सादर केले आणि कृष्णाईच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. नातेवाईकांचा विरोध असून देखील कृष्णाईने आई वडिलांच्या साथीने भारुड विश्वात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भारुडाच्या माध्यमातून, कृष्णाईने महाराष्ट्रात २०० हून अधिक भारुडाचे प्रयोग केले आहेत. स्त्रीभ्रूणहत्या,दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, दारूबंदी, हुंडाबंदी, व्यसनमुक्ती असे असंख्य विषय, अनेक रंगमंच, आवाज मात्र एकच तो म्हणजे कृष्णाईचा !
दुष्काळग्रस्त धाराशिवमध्ये जन्मलेल्या कृष्णाईने समाजात बदल घडवून आणण्यासाठी भारुड हे माध्यम निवडले. कृष्णाईच्या कामाची दखल मेनस्ट्रीम मेडियाने देखील घेतली आहे. झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’, ‘जाऊ बाई गावात’ या कार्यक्रमात भारुडाचे सादरीकरण केले.
लोककलेची ओळख आजच्या तरुण पिढीला होण्यासाठी आणि त्यांच्यात ही कला रुजविण्यासाठी कृष्णाईने “कलाकट्टा” या कार्यक्रमाची निर्मिती केली. यामध्ये मुलाखत पर लोककलेचे सादरीकरण केले जाते. आजपर्यंत कृष्णाईला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आले आहे.
भारुड ही महाराष्ट्राची लोककला, आपल्या आवाजाने सातासमुद्रापार पोहोचविण्यासाठी कृष्णाईस खूप खूप सदिच्छा !
आपल्या महाराष्ट्राची लोककला भारुड जिवंत ठेवणाऱ्या कृष्णाईला यशवंतराव चव्हाण सेंटरचा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा रंगमंचीय कलाविष्कार पुरस्कार’ देताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.


















