मुंबई : राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत शिक्षणातील मूल्यांकन पद्धतींमध्ये होत असलेल्या बदलांचा सर्वंकष आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेली सोळावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. शिक्षण विकास मंच आणि यशवंतराव चव्हाण सेंटर यांनी आयोजित केलेल्या या परिषदेला राज्यभरातून उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
'राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०: मूल्यांकनाच्या नव्या दिशा' या विषयावर आधारित परिषदेत राज्यातील विविध जिल्ह्यांतून आलेले शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, संशोधक, अभ्यासक, प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. शिक्षण क्षेत्रातील सध्याच्या घडामोडी, नव्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव, मूल्यांकनातील धोरणात्मक बदल आणि तंत्रज्ञानाची भूमिका याबाबत परिषदेदरम्यान सखोल चर्चा घडून आली. परिषदेच्या सुरुवातीस मानद कार्यक्रमप्रमुख दत्ता बाळसराफ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. या परिषदेचे प्रास्ताविक मुख्य समन्वयक डॉ. माधव सूर्यवंशी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिक्षण विकास मंचाच्या कामाचा आलेख सांगून शिक्षणातील मंचाची भूमिका स्पष्ट केली.
शिक्षण परिषदेची भूमिका स्पष्ट करताना, यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष मा. खा. सुप्रिया सुळे यांनी 'गुण देणे म्हणजे मूल्यांकन नव्हे, विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा प्रवास समजून घेणे म्हणजे मूल्यांकन होय' असे सांगितले. आपल्या भाषणात त्यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलत्या वास्तवावर भाष्य करताना सांगितले की, मूल्यांकन हे केवळ गुणांकनाची प्रक्रिया नाही. मूल्यांकन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा प्रवास, त्यांची जिज्ञासा, विचारशक्ती, सर्जनशीलता आणि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल विकास घडविणारी प्रक्रिया आहे.
आजच्या विद्यार्थ्यांवर स्पर्धेचा अतिताण आहे. पालकांच्या अपेक्षा मुलांवर मानसिक दडपण निर्माण करतात. मुलांनी सर्व काही शिकायलाच हवे, ही अपेक्षा शिक्षणविरोधी ठरते, असे त्यांनी नमूद केले. प्रत्येक विद्यार्थ्याची गुणवत्ता वेगळी असते. प्रत्येक जण आपापल्या वेगाने प्रगती करतो. गुणांपेक्षा क्षमता आणि मूल्याधिष्ठित शिक्षण महत्त्वाचे आहे.
तंत्रज्ञान आणि अल्गोरिदमच्या वाढत्या वापरासंदर्भात त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये समीक्षात्मक विचारशक्ती विकसित करण्याची गरज व्यक्त केली. शिक्षणातील प्रयोगांची नोंद आणि त्याचे परिणामकारक मूल्यांकन करणे ही भविष्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
या परिषदेचे बीजभाषण एमकेसीएलचे मुख्य मेंटॉर विवेक सावंत यांनी केले. बीजभाषणात त्यांनी मूल्यांकन वर्षभर चालणारी प्रक्रिया आहे, असून तिच्या व्यापक संकल्पनेचे विश्लेषण केले. त्यांनी स्पष्ट केले की, पारंपरिक शिक्षणपद्धतीत गुण म्हणजेच शिक्षण आणि निकाल म्हणजेच प्रगती असा संकुचित दृष्टिकोन तयार झाला होता. मात्र, NEP २०२० नुसार मूल्यांकन आता सतत चालणारी प्रक्रिया असून विद्यार्थ्यांच्या शिकण्यातील बदलांची नोंद घेणारी आहे. हे शिक्षक-विद्यार्थी संवादाचे सक्षम साधन अशी नवी ओळख यामुळे प्राप्त करून देत आहे.
त्यांनी PARAKH, HPC, कौशल्याधारित मूल्यांकन आणि बहुआयामी प्रगती मूल्यांकनाची माहिती दिली. त्यांचे एक अत्यंत प्रभावी विधान परिषदेत लक्षवेधी ठरले, ते म्हणजे, 'जेव्हा गुण हेच ध्येय ठरते, तेव्हा शिक्षणाचा मूक बळी जातो.' शिक्षण अनुकरण → अनुसरण → अनुसर्जन या प्रवासातून घडते, असा अनुभव त्यांनी सांगितला.
या परिषदेत “डॉ. कुमुद बन्सल राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५” प्रदान करण्यात आला. पुरस्कार विजेते किशोर मोतीराम भागवत (बुलढाणा) आणि विजया शरद किरमीरवार (आनंदवन, भामरागड, गडचिरोली) यांना नवोपक्रमशील अध्यापन पद्धती, विद्यार्थीकेंद्रित दृष्टिकोन आणि सामाजिक भान जपणाऱ्या शिक्षणकार्यामुळे गौरविण्यात आले. डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार रती भोसेकर लिखित 'बालशिक्षण-एक अद्भुत सफर' या ग्रंथाला मिळाला. 'नाविन्यातून नैपुण्य', 'फुलताना', 'उन्नती – समावेशित शिक्षणाची' या पुस्तकांना लक्षवेधी शैक्षणिक ग्रंथ म्हणून गौरविण्यात आले. राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आणि प्रश्नमंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांकडून गौरव करण्यात आला.
मूल्यांकनाचे नवे प्रयोग सादर करताना डॉ. मिलिंद नाईक यांनी ज्ञानप्रबोधिनीतील मूल्यांकन प्रयोगांची माहिती दिली. त्यांनी अनुभवाधारित शिक्षण आणि स्वमूल्यांकन यांचा शैक्षणिक परिणाम अधोरेखित केला. डॉ. विशाल पाजणकर यांनी एनसीईआरटी, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावर मूल्यांकनात काय काम केले जात आहे, याचे सादरीकरण केले. PARAKH ची संकल्पना, राष्ट्रीय मूल्यांकन चौकट आणि बहुमितीय कौशल्य मूल्यांकन याचे सविस्तर विश्लेषण त्यांनी केले.
डॉ. राजेंद्र मोरे (रयत शिक्षण संस्था) यांनी संस्थात्मक पातळीवरील मूल्यांकन उपक्रम मांडले. परिषदेला उपस्थित असलेल्या शिक्षकांनी खुल्या चर्चासत्रात ग्रामीण-शहरी मूल्यांकनातील भेद, शिक्षक प्रशिक्षणाची आवश्यकता आणि डिजिटल साधनांचा जबाबदार वापर यावर मुद्दे उपस्थित केले. डॉ. विकास गरड, बसंती रॉय आणि ऐनुल अत्तार यांनी या सत्राला मार्गदर्शन केले. या सत्राचे संचालन अरविंद शिंगाडे आणि सोमनाथ वाळके यांनी केले. उपस्थित शिक्षकांनी ही परिषद शिक्षण व्यवस्थेला नवा बौद्धिक वेग देणारी ठरली आहे, असा विश्वास व्यक्त केला.
समारोप सत्रात डॉ. वसंत काळपांडे आणि धनवंती हर्डीकर यांनी परिषदेतील मुद्द्यांचा आढावा घेऊन, ही परिषद केवळ कार्यक्रम नव्हे तर शिक्षण व्यवस्थेतील नव्या मूल्यांकनाला दिशा दाखवणारी आहे, असे प्रतिपादन केले. परिषदेतील उपस्थितांचे आभार योगेश कुदळे यांनी व्यक्त केले, तर निवेदन मच्छिंद्र बोऱ्हाडे आणि अचला मचाडो यांनी केले.




