प्रो.अनिल कुमार गुप्ता

राष्ट्रीय पुरस्कार
2025

प्रचंड विविधता असणाऱ्या विकसनशील भारताची खरी ताकद कुठे दडलेली आहे? या प्रश्नाचा अचूक शोध घेतला, तर ती ताकद मोठमोठ्या इमारतींमध्ये किंवा अत्याधुनिक प्रयोगशाळांमध्ये कमी आणि मातीशी नातं सांगणाऱ्या हातांमध्ये अधिक सापडते. शेतात राबणारा शेतकरी, जंगलात राहणारा आदिवासी, गावात साधनांच्या मर्यादेत जगणारा कारागीर या सगळ्यांच्या अनुभवातून जन्म घेणारी कल्पकता, हीच भारताची खरी बौद्धिक संपत्ती आहे. या संपत्तीला ओळख देणारे, तिला मानसन्मान मिळवून देणारे आणि तिला जागतिक व्यासपीठावर नेणारे जे काही मोजके विचारवंत आहेत, त्यात अग्रभागी नाव येते, ते म्हणजे पद्मश्री प्रोफेसर डॉ.अनिल कुमार गुप्ता यांचे. कारण, त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे ज्ञान, संवेदना आणि सामाजिक जबाबदारी यांचा विलक्षण संगम आहे.

मधमाशी जशी फुलातून मध घेते, पण फुलाला इजा न करता उलट त्याचे परागीकरण करते. अगदी तसाच दृष्टिकोन प्रोफेसर डॉ.अनिल कुमार गुप्ता यांच्या कार्यात दिसतो. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या ज्ञानाला नेहमी मानसन्मान आणि श्रेय दिलं. कारण, त्यांच्यासाठी ज्ञान ही शोषणाची वस्तू नव्हती, तर सहअस्तित्वाची प्रक्रिया होती. याच मूल्यांवर त्यांनी आपले संपूर्ण शैक्षणिक आणि सामाजिक आयुष्य घडवले. म्हणूनच "Minds on the Margin are not Marginal Minds" अर्थात समाजाच्या परिघावर राहणारी माणसे ही उपेक्षित बुद्धिमत्तेची नसतात. हाच त्यांचा दृष्टीकोन आहे. त्यामुळेच त्यांचे योगदान केवळ शोधांपुरते मर्यादित राहिले नाही. तर त्या शोधांना पेटेंट मिळवून देणे, नवसंशोधकांना उद्योजक बनवणे, त्यांना बाजारपेठ आणि जागतिक मंच मिळवून देणे, हे काम त्यांनी सातत्याने केले. त्यातून अनेक सामान्य माणसांचे आयुष्य बदलले, आत्मविश्वास वाढला आणि 'आपणही काहीतरी करू किंवा देऊ शकतो' ही भावना अधिक दृढ झाली. त्यांचे 'ग्रासरूट इनोव्हेशन' (Grassroots Innovation) अर्थात 'तळागाळातील नवोपक्रम' हे अतिशय प्रसिध्द पुस्तक आज जगभरातील धोरणकर्ते, अभ्यासक आणि विकास क्षेत्रातील कार्यकर्त्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. कारण, ते विकासाकडे माणूस-केंद्रित दृष्टीने पाहायला शिकवते.

भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद अर्थात आयआयएम (IIM) येथे तब्बल ३६ वर्षे अध्यापन करत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रम शिकवला नाही, तर विचार करण्याची, प्रश्न विचारण्याची आणि वास्तवाकडे संवेदनशील नजरेने पाहण्याची दृष्टी दिली. त्यांनी वर्गखोलीच्या चौकटी मोडून सांगितले की, खरा भारत हा अभ्यासाक्रमांच्या पलीकडे म्हणजेच शेती, जंगल आणि गावखेड्यात वसलेला आहे. याच जाणिवेतून त्यांनी 'शोधयात्रा' या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. अनवाणी पायांनी हजारो किलोमीटर चालत, अगदी गावोगावी फिरत, त्यांनी सामान्य माणसांमधील असामान्य कल्पकतेचा शोध घेतला. त्यामुळेच प्रयोगशाळेऐवजी झोपडी, शेत आणि गोठा हेच त्यांचे संशोधन केंद्र बनले.

या शोधयात्रांमधून अनेक अद्भुत नवकल्पना समोर आल्या. मातीचा रेफ्रिजरेटर बनवणारा कारागीर असो किंवा सायकलवर चालणारा पंप तयार करणारा ग्रामीण तंत्रज्ञ असो. प्रोफेसर अनिल गुप्ता यांनी या सर्वांकडे गरीब पण 'हुशार' म्हणून नव्हे, तर ज्ञानसंपन्न 'नवसंशोधक' म्हणूनच पाहिले. कारण, त्यांची नजर केवळ शोधांवर नव्हे, तर त्या शोधांमागील माणसावरच होती. म्हणूनच त्यांनी त्या सर्व नवसंशोधकांना योग्य ती संधी, मानसन्मान आणि विश्वास दिला. आणि हीच संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी हनी बी नेटवर्कची (Honey Bee Network) स्थापना केली. या नेटवर्कने ग्रामीण आणि स्थानिक ज्ञानाचे दस्तऐवजीकरण केले. तसेच त्या ज्ञानाचे हक्क मूळ संशोधकांकडे राखले. शिवाय, ज्ञानाच्या देवाण-घेवाणीत नैतिकता जपली. पुढे 'सृष्टी' (SRISTI), नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन (NIF) आणि गुजरात ग्रासरूट्स इनोव्हेशन ऑगमेंटेशन नेटवर्क (GIAN) यांसारख्या संस्थांच्या माध्यमातून हे कार्य अधिक व्यापक झाले. त्यातून एक लाखांहून अधिक ग्रामीण नवकल्पनांचा डेटाबेस उभा राहिला. जो केवळ आकड्यांचा संग्रह नाही, तर भारताच्या सर्जनशील क्षमतेचा जिवंत दस्तऐवज आहे.

ग्रामीण विकास, सामाजिक न्याय आणि समतेचा विचार मांडणारे यशवंतराव चव्हाण साहेब यांचे मूल्यविश्व आणि प्रोफेसर डॉ.अनिल गुप्ता यांचे कार्य यामध्ये विलक्षण साम्य आहे. दोघांचाही केंद्रबिंदू एकच. तो म्हणजे तळागाळातील माणूस. त्याची प्रतिष्ठा आणि त्याला संधी देणारी व्यवस्था. म्हणूनच प्रोफेसर डॉ.अनिल गुप्ता यांचे कार्य हे केवळ शैक्षणिक किंवा संशोधनात्मक न राहता सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन ठरते. कारण, सेवानिवृत्तीनंतरही ते थांबलेले नाहीत. सध्या ते देश-विदेशात व्याख्याने देतात. तरुण पिढीला प्रोत्साहन देतात. तसेच विचार, करुणा आणि नवकल्पना यांचा संगम साधायला प्रेरित करतात. म्हणूनच प्रोफेसर डॉ.अनिल कुमार गुप्ता यांच्या आयुष्याकडे बारकाईने पाहिल्यास, नवनिर्मिती ही फक्त तंत्रज्ञानातून जन्माला येत नाही, तर ती संवेदनशीलतेतून, माणसावरच्या विश्वासातून आणि सामाजिक जबाबदारीतून आकार घेते. याची आपल्या सर्वांनाच प्रचिती येते.

'ग्रासरूट इनोव्हेशन'चे जनक, हनी बी नेटवर्कचे संस्थापक आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रोफेसर डॉ.अनिल कुमार गुप्ता यांना यशवंतराव चव्हाण सेंटरचा 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. कारण, हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नाही, तर एका मूल्यपरंपरेचा सन्मान आहे.

यशवंतराव चव्हाण डिजिटल मीडिया