नाशिक: "हा देश कोणाच्या मनमर्जीने नाही, तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने चालतो. आज २१ या शतकात आपला महाराष्ट्र नेमका कोठे चालला आहे, याचे सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे. महाराष्ट्राला प्रगतीपथावर पुढे घेऊन जाण्याची नैतिक जबाबदारी आजच्या युवा पिढीची आहे. महाराष्ट्राची गेलेली आण, बाण आणि शान परत आणण्यासाठी युवा वर्गाला सोबत घेऊन एक नवी सामाजिक क्रांती घडवण्याची गरज आहे," असे परखड मत चव्हाण सेंटर आयोजित युवा पुरस्कार सोहळ्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दिला जाणारा 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार' सोहळा नाशिक येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याला प्रमुख पाहुण्या म्हणून खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते राज्यातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या युवा गुणवंतांना पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.

याप्रसंगी खासदार भास्कर भगरे सर, ॲड. नितीन ठाकरे, गौरव सोमवंशी, अशोक पिंगळे, राजेंद्र डोखळे, सुरेखा बोराडे, विजय गायकवाड, दत्ता बाळसराफ, निलेश राऊत, योगेश कुदळे, संतोष मेकाले, रणजीत बायस, अतुल तांडेल तसेच यशवंतराव चव्हाण सेंटरचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या पाठीमागे त्यांच्या पालकांचे मोठे योगदान असते, असे सांगत त्यांनी आज युवा पुरस्कार मिळालेल्या सर्व तरुणांच्या पालकांचे विशेष कौतुक व अभिनंदन केले. "आपल्या स्वतःच्या यशापेक्षा आपल्या मुलांच्या यशात पालकांना जास्त आनंद असतो," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. पुढे त्या म्हणाल्या की, "आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांची विज्ञानावर अढळ श्रद्धा होती. त्यांनी नेहमी शिक्षणाला प्राधान्य दिले, कारण समाजात खरी समानता ही केवळ शिक्षणातूनच येऊ शकते. माझी पांडुरंगावर पूर्ण श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धेवर नाही. आजची युवा पिढी अंधश्रद्धेकडे जात असल्याचे पाहून चिंता वाटते. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या या महाराष्ट्रात आजही अनेक भोंदू बुवा महिलांचे शोषण करत आहेत, याकडे लक्ष वेधताना, अशा बुवांना आजच्या काळात जेलमध्ये टाकले आहे. महाराष्ट्रातील सामाजिक प्रश्नांवर, मग ते ड्रग्ज असो की अंधश्रद्धा, याविरोधात मुख्यमंत्र्यांनी मोहीम काढली तर आम्ही सर्व राजकारण बाजूला ठेवून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. आमची राजकीय लढाई वैचारिक पातळीवर होत राहील, परंतु सामाजिक विषयांवर आम्ही नेहमी एकत्र येऊ, हेच संस्कार आमच्यावर चव्हाण साहेबांनी केले आहेत."

महिलांच्या हक्कांवर बोलताना त्या म्हणाल्या, "आज जर समाजात बुरसटलेले विचार कायम राहिले असते, तर महिला केवळ स्वयंपाकघरातच दिसल्या असत्या. पण, स्वयंपाकघर आणि घर कौशल्याने सांभाळणाऱ्या महिला देशाच्या विकासात तितक्याच महत्त्वाच्या आहेत, कारण त्यांच्या त्यागामुळेच आज अनेकजण मोठी यशोशिखरे सर करू शकले आहेत." आज २१ व्या शतकात महिला निर्णयप्रक्रियेत आघाडीवर असल्या तरी स्त्रीभ्रूणहत्येसारखे कलंकित प्रश्न आजही कायम आहेत, याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. "आज आपण मुलींना योग्य वेळी 'नाही' म्हणायला शिकवले पाहिजे, हीच खरी सामाजिक बांधिलकी आहे. आणि जेव्हा आपण हे करू, तेव्हाच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे नाव घेण्याचा खरा अधिकार असेल," असे त्या म्हणाल्या.