यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या वर्षी पंधराव्या वर्षात पदार्पण करतो आहे. त्या निमित्ताने महोत्सवाबरोबर एक लघुपट स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. लघुपट या माध्यमाने गेल्या काही वर्षात चित्रपट उद्योगात लक्षवेधी कामगिरी बजावली आहे आणि ते तरुण पिढीसाठी व्यक्त होण्याचं महत्वाचं साधन बनलं आहे. महोत्सवाच्या निमित्ताने नव्या दिग्दर्शकांना आणि चित्रकर्मींना उत्तेजन मिळावं, हा स्पर्धेमागचा प्रमुख हेतू आहे.

लघुपट स्पर्धेचा विषय: ‘बदलतं स्त्रीरूप आणि समाज’.

हा लघुपट ‘फिक्शन/कल्पित’ या विभागातला असावा. माहितीपट स्वीकारण्यात येणार नाहीत.

स्पर्धेत भाग घेतलेल्या लघुपटांमधून मान्यवर ज्युरी ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ निवडतील आणि रु. १,००,०००/- आणि मानचिन्ह देऊन त्याला गौरवण्यात येईल. याबरोबरच उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट छायालेखन आणि उत्कृष्ट अभिनय (पुरुष/महिला), असे विशेष पुरस्कार देण्यात येतील ज्यांचं स्वरुप प्रत्येकी रु. १०,०००/- आणि मानचिन्ह असं असेल. सर्वोत्कृष्ट लघुपटाबरोबर ‘ज्युरी पुरस्कार’ आणि ‘प्रेक्षकपसंती पुरस्कार’ असे इतर दोन पुरस्कारही देण्यात येणार आहेत. प्रमाणपत्र आणि मानचिन्ह, असं या पुरस्कारांचं स्वरुप असेल. स्पर्धेत भाग घेणाऱ्या निवडक चित्रपटांचा यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात समावेश केला जाईल. या लघुपट स्पर्धेसाठी पाठवल्या जाणाऱ्या चित्रपटाचा ‘भारतीय प्रिमीअर’ महोत्सवात होणं अपेक्षित असल्याने, हा लघुपट इतरत्र दाखवण्यात आलेला नसावा.

यावर्षी लघुपटांसाठी एक स्पर्धाबाह्य विभागही महोत्सवात असणार आहे, ज्यासाठीही प्रवेशिका मागवण्यात येत आहेत. या विभागातले लघुपट ‘फिक्शन/कल्पित’ असावा, परंतु त्याला विषयाची अट नाही. यातल्या निवडक लघुपटांचा समावेशही महोत्सवात केला जाईल. स्पर्धाबाह्य लघुपटांसाठी ‘भारतीय प्रिमिअर’ असण्याची अट नाही, पण त्यांची निर्मिती १ जानेवारी २०२४ नंतरची असावी.

महत्वाच्या अटी:

  • स्पर्धा आणि स्पर्धाबाह्य, या दोन्ही विभागातल्या लघुपटांची लांबी २० मिनिटांहून अधिक नसावी .
  • दिग्दर्शकाची वयोमर्यादा १८ ते ३० वर्षे असावी.
  • दिग्दर्शक भारताचा नागरिक असावा.
  • लघुपटांचा फॉरमॅट HDMOV किंवा HDMP4 (१०८०X१९२० रेझोल्यूशन) असावा, ऑडिओ - स्टिरीओ किंवा 5.1, आणि फाइलचा आकार २ जीबीपेक्षा कमी असावा.
  • स्पर्धेत भाग घेणाऱ्या चित्रपटांना फॉर्म भरतेवेळी दोन स्टिल्स, कास्ट/क्रू यादी, आणि चित्रपटाची ऑनलाईन लिंक द्यावी लागेल.
  • निवडीसाठी वॉटरमार्क प्रत चालू शकेल, पण निवड झाल्यास दिलेल्या मुदतीत स्क्रीनिंगसाठी स्वच्छ प्रत उपलब्ध करुन द्यावी लागेल.
  • सर्व चित्रपटांना इंग्रजी सबटायटल्स असणे आवश्यक आहे.
  • स्पर्धा विभागात ज्युरीचा आणि स्पर्धाबाह्य विभागात आयोजकांचा निर्णय अंतिम असेल.
  • लघुपट पाठवण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२४ असेल.

Register here