सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा! आजचा दिवस समाजातील अनिष्ट प्रथा-प्रवृत्ती दूर सारून इष्ट प्रवृत्तीनां विजय मिळवून देण्यास कटिबद्ध होण्यासाठी संकल्प करण्याचा शुभदिन आहे.
दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधून सेंटरच्या कार्याविषयी आस्था, आपुलकी असणाऱ्या सर्व हितचिंतक, कार्यकर्ते यांच्याशी सातत्यपूर्ण संवाद साधण्यासाठी ‘ब्लॉग’च्या माध्यमातून नियमितपणे संपर्क ठेवण्याचे योजिले आहे. संस्थेच्या विविध कामांची माहिती वृत्तपत्रातील व वाहिन्यांवरील बातम्या तसेच समाजमाध्यमातील Facebook, Yutube, Instagram, WhatsApp यांच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिवाय Podcastद्वारे देखील विविध विषयांवर मान्यवरांना बोलते करण्यात आम्हाला यश आले आहे. त्यात आता ‘ब्लॉग’द्वारे अजून एक ‘संवाद सेतू’ उभारण्याचे आम्ही ठरविले आहे. आपण त्याचे निश्चितच स्वागत कराल, अशी अपेक्षा आहे.
राज्य आल्यावर त्याचा वापर कसा करायचा ही भूमिका मांडण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी अनेक व्याख्यानातून केले. पंचायत राज्याची यंत्रणा आणली. इतकेच नाही तर सामाजिक, शेती, शिक्षण, औद्योगिक अशा अनेक क्षेत्रात मोलाची कामगिरी त्यांनी केली. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशी अनेक शहरे उद्योगाच्या क्षेत्रात उच्चांक गाठण्याच्या मागे यशवंतराव चव्हाण साहेबांची दूरदृष्टी महत्त्वाची होती असे उद्गार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काढले. यशवंतराव चव्हाण यांचे महाराष्ट्राच्या निर्मितीत योगदान महत्त्वाचे आहेच शिवाय हे राज्य मराठी भाषिकांचे होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केला. पण यात महाराष्ट्राचा मंगलकलश आणण्याचे काम यशवंतराव चव्हाण साहेबांनी केले असेही ते म्हणाले.
मुंबई दि. १४ : प्रत्येक काळात आव्हाने असतातच. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळीही खुप मोठी आव्हाने होती. यशवंतराव चव्हाणांकडे महाराष्ट्राचे नेतृत्व होते.सन १९५७ ते १९६० हा अत्यंत संघर्षाचा काळ होता. महाराष्ट्राच्यासमोर पैसा, शिक्षण, दारिद्र्य अशी अनेक आव्हाने होती. यशवंतराव चव्हाण यांनी सहकाराच्या माध्यमातून महाराष्ट्राला आर्थिक स्वातंत्र्य देण्याचे आणि सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे उत्तुंग काम केले. बहुजनांची मुले शिकली पाहिजेत यासाठी ईबीसी सवलत मंजूर केली. राजकारणात तोच टिकून राहतो, जो आव्हाने पेलतो. राजकारणामध्ये सगळ्यांना सगळंच करावं लागतं, पण मिळवलेली सत्ता कोणासाठी वापरायची हे ज्याला कळलं तोच यशस्वी राज्यकर्ता ठरतो असं ते म्हणत. विरोधकांनाही सन्मान देणारा नेता म्हणून त्यांचा लौकिक होता.