सर्वांना विजयादशमी आणि दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा! आजचा दिवस समाजातील अनिष्ट प्रथा-प्रवृत्ती दूर सारून इष्ट प्रवृत्तीनां विजय मिळवून देण्यास कटिबद्ध होण्यासाठी संकल्प करण्याचा शुभदिन आहे.

दसऱ्याचा शुभ मुहूर्त साधून सेंटरच्या कार्याविषयी आस्था, आपुलकी असणाऱ्या सर्व हितचिंतक, कार्यकर्ते यांच्याशी सातत्यपूर्ण संवाद साधण्यासाठी ‘ब्लॉग’च्या माध्यमातून नियमितपणे संपर्क ठेवण्याचे योजिले आहे. संस्थेच्या विविध कामांची माहिती वृत्तपत्रातील व वाहिन्यांवरील बातम्या तसेच समाजमाध्यमातील Facebook, Yutube, Instagram, WhatsApp यांच्याद्वारे लोकांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न असतो. शिवाय Podcastद्वारे देखील विविध विषयांवर मान्यवरांना बोलते करण्यात आम्हाला यश आले आहे.  त्यात आता ‘ब्लॉग’द्वारे अजून एक ‘संवाद सेतू’ उभारण्याचे आम्ही ठरविले आहे. आपण त्याचे निश्चितच स्वागत कराल, अशी अपेक्षा आहे.

आदरणीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचार व कार्याचा वसा आणि वारसा घेऊन संस्थेचा प्रवास १९८५ साली सुरु झाला.  या प्रवासाला चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. नवमहाराष्ट्राच्या सर्वांगीण उभारणीची पायाभरणी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली.  राज्याच्या विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे योगदान त्यासाठी लाभले. त्या सर्वांचा यथोचित मान-सन्मान आदर राखत चव्हाण साहेबांनी अनेक संस्था सुरु केल्या.  विविध उपक्रमांची आखणी केली. यातून  प्रागतिक महाराष्ट्राची वाटचाल वेगाने घडत आहे. देशात उद्योग-व्यापारासह, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रांत महाराष्ट्राचा ठसा उमटत आहे. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मुशीत वाढलेल्या माननीय शरदराव पवार साहेबांनी ही परंपरा कायम राखली. त्यांनाही चव्हाण साहेबांप्रमाणे समाजातील मान्यवरांची साथ लाभली आणि राज्याची घोडदौड सुरू आहे.  यशवंतराव चव्हाण सेंटर या कार्यात एक संस्थात्मक माध्यम म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे.  प्रागतिक विचारांच्या सर्व संस्था, संघटना, कार्यकर्ते यांना या कार्यात जोडून घेत आहे.  तसेच नव्या पिढीतील कार्यकर्तेही घडवित आहे.

यशवंतराव चव्हाण सेंटर चाळीशीत पदार्पण करीत असताना अनेक प्रकारच्या बदलांना सामोरे जात आहे. सेंटरच्या कार्याध्यक्ष मा. सुप्रियाताई सुळे यांच्या आधुनिक दृष्टीने गेली काही वर्षे अनेक सर्जनशील नवोपक्रम सुरु झाले आहेत. नव्या पिढीचे, नव्या दमाचे सहकारी यामध्ये हिरिरीने भाग घेत आहेत. पुरस्कार, प्रबोधन, प्रशिक्षण, फेलोशिप, प्रकाशन, महोत्सव अशा विविध योजनांची अंमलबजावणी याबरोबरच संशोधन केंद्राचीही मुहूर्तमेढ रोवली गेली आहे.

विविध जिल्ह्यातून सेंटरची केंद्रे सुरु करण्यासाठी स्थानिक मंडळी पुढे येत आहेत. आजवर राज्याच्या २८ जिल्ह्यात केंद्राची स्थापना झाली आहे. उर्वरित जिल्ह्यातही येत्या वर्षभरात केंद्रे सुरु होतील. शिक्षण, आरोग्य (दिव्यांग ज्येष्ठ नागरिक), युवा, महिला, सांस्कृतिक क्षेत्रांतील हजारो लोक विविध कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

या सगळ्या घडामोडींबाबत नियमितपणे वाचकांशी संपर्कात राहून त्यांचा प्रतिसाद जाणून घ्यावा व आवश्यक ते बदल, सुधारणा कराव्यात, हाच हेतू यामागे आहे.  आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या दूरदृष्टीचा प्रत्यय देणारे विचारही या ‘ब्लॉग’ मधून वेळोवेळी आपणास वाचायला मिळतील.

कोणत्याही संस्थेने आपल्या मूल्यधारणा भक्कम करुन कामाच्या पद्दतीत नित्यनव्या स्वरूपाचा अविष्कार केल्यानेच संस्था कालसुसंगत राहतात.

दसऱ्याचा दिवस हा सीमोल्लंघन करण्याचा तथा प्रवर्तनाचा प्रवास सुरु करण्याचा दिवस म्हणून ओळखला जातो. भारतीय समाजात जात, पंथ, धर्म, प्रदेश, भाषा आदीबाबत प्रचंड वैविध्य आढळते.  त्यातून एकात्म समाजमन घडविण्याचे स्वप्न आपल्याला साकार करावयाचे आहे.   हे करताना सेवाभाव, विश्वासार्हता, प्राविण्य, सर्जनशीलता आणि उत्तरदायित्व या मूल्यांचा ठायी ठायी प्रत्यय देईल अशा कृतिशील निरंतर प्रवासाची वाट अधिक गतिमान करण्यासाठी दृढ निश्चय करूया.

जय हिंद! जय महाराष्ट्र!!