यशवंतराव चव्हाण सेंटरचा आरोग्य, दिव्यांग विभाग व पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई तसेच महात्मा गांधी सेवा संघ संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामुदायिक दिव्यांग विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. हा सामुदायिक विवाह सोहळा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजेच ३ जानेवारी रोजी रोजी उत्साहात पार पडला. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेले निर्बंध लक्षात घेता सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून हा विवाह सोहळा पार पडला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून व भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.
चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सौ. सुप्रियाताई सुळे यांनी ऑनलाइन माध्यमातून या सोहळ्यास उपस्थित राहून वधूवरांना शुभेच्छा व शुभाशीर्वाद दिले. दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून व्यापक कार्यक्रम राबवण्यात यावा, अशी अपेक्षा यावेळी त्यांनी व्यक्त केली. या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मला योगदान देता आले याचे समाधान वाटते, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
याप्रसंगी राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे, तत्कालीन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री. धनंजय मुंडे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष सौ. रुपाली चाकणकर आदी मान्यवर व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते.
तसेच वधूवरांना प्रत्यक्षात आशीर्वाद देण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष श्री. रणजित शिवतरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. प्रदिप गारटकर, शहराध्यक्ष श्री. प्रशांत जगताप, समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार हे मान्यवर विवाह सोहळ्यास उपस्थित होते.