मुंबई दि. १३ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिले जाणारे ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक २०२६’ कोरो इंडिया यांना जाहीर झाले आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या ४२ व्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर रोजी चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हे पारितोषिक दिले जाणार आहे. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे.

कोरो इंडिया ही प्रामुख्याने महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये तळागाळातील वंचित आणि उपेक्षित घटकांच्या सक्षमीकरणासाठी काम करणारी सामाजिक संस्था आहे. हि संस्था प्रामुख्याने महिला सक्षमीकरण आणि कायदेशीर हक्क, तळागाळातील नेतृत्व विकास, राईट टू पी मोहीम, लैंगिक समभाव आणि शिक्षण, नैसर्गिक संसाधनांवर अधिकार आणि पर्यावरण या विषयांवर काम करते. हे पारितोषिक जाहीर झाल्याबद्दल चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी युसुफ मेहेरअली सेंटर, तारा यांचे अभिनंदन केले आहे.

स्व. चव्हाण साहेबांच्या पुण्यतिथीदिनी येत्या २५ नोव्हेंबर २०२६ रोजी हा सोहळा यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे पार पडणार आहे. यावेळी नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खा. सुप्रिया सुळे यांनी केले आहे. दरवर्षी कृषी, औद्योगिक, सामाजिक, व्यवस्थापन, प्रशासन, विज्ञान, तंत्रज्ञान, ग्रामीण, आर्थिक विकास, मराठी साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक' देण्यात येते.

या पारितोषिकाची सुरुवात १९९० पासून झाली. इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव, कवयित्री शांता शेळके, पत्रकार गोविंदराव तळवलकर, प्रा. एन.डी. पाटील, सिरम इन्स्टिटयुट ऑफ इंडिया, डॉ. यशवंत मनोहर आदी मान्यवर साहित्यिक आणि संस्थांना या पारितोषिकाने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.