मुंबई - शैक्षणिक धोरण आराखडा २०२४ मध्ये शालेय शिक्षण, कला, व्यावसायिक शिक्षणाचा समावेश अभ्यासक्रमात केला आहे; पण अंमलबजावणीबाबत नियोजनाचा त्यामध्ये काहीच उल्लेख नाही. व्यावसायिक शिक्षणाचा शालेय अभ्यासक्रम आराखड्यात समावेश होणे महत्त्वाचे आहे. मात्र, या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मनुष्यबळ आणि अर्थबळ मिळाले नाही, तर ते यशस्वी कसे होणार, असा सवाल शिक्षणतज्ज्ञांनी यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये रविवारी झालेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेमध्ये उपस्थित केला.
या शैक्षणिक आराखड्यामध्ये बाळ जन्मल्यापासून ते जबाबदार नागरिक होईपर्यंत त्याच्या शिक्षणाबद्दल नियोजन मांडलेले दिसते, असे निरीक्षण शिक्षणतज्ज्ञ प्रा. डॉ. सुनील कुमार लवटे यांनी नोंदविले. परिषदेस २८ जिल्ह्यांमधून शिक्षक, अभ्यासकांनी हजेरी लावली. आपली मते, सूचना यशवंतराव चव्हाण सेंटरकडे मांडा. त्या शिक्षणमंत्री आणि संबंधित मंत्रालयाकडे पोहोचवण्याचे काम मी नक्की करेन, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी दिले.
चॅट जीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थी आता आपले प्रश्न सोडवणार आहेत, ही चिंताजनक बाब आहे. स्वतःच्या बुद्धीचा वापर कमीत कमी झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास कसा होणार? अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.
पुण्याच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. विकास गरड यांनी विद्यार्थ्यांना आता शिक्षणासोबतच कार्यानुभव मिळणार असल्याने त्यांना शिक्षण संपत असताना वेगळ्या अनुभवाची गरज लागणार नसल्याचे सांगितले. डॉ. योगेश कुलकर्णी यांनी अभ्यासक्रम आराखड्यात व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व सांगितले.