औरंगाबाद (दि.१४) : यशवंतराव चव्हाण सेंटर, जिल्हा केंद्र औरंगाबाद व एमजीएम जर्नालिझम कॉलेज व फिल्म आर्टस् स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चित्रपट चावडी या उपक्रमात बहुचर्चित 'टू मच डेमोक्रॅसी' या माहितीपटाचे विशेष प्रदर्शन करण्यात येणार आहे. एमजीएम कॅम्पस येथील चित्रपती व्ही.शांताराम प्रेक्षागृह येथे शनिवार दि.२३ जुलै २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता सदरील माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.

शेतकऱ्यांवर लादलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात जानेवारी २०२० मध्ये दिल्लीच्या चार सीमांवर सुरू झालेल्या आणि सलग ३७८ दिवस चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावरील हा एक ९२ मिनिटांचा माहितीपट आहे. अनोखी पब्लिकेशन्स यांनी माहितीपटाची निर्मिती केली असून पराग पाटील निर्माते आहेत. वरुण सुखराज या युवा दिग्दर्शकाने या माहितीपटाचे दिग्दर्शन केले आहे.

निषेध आंदोलने ही समाजातील व्यथा आणि अस्वस्थतेची अभिव्यक्ती आहे. २०२० मध्ये दिल्लीत चाललेल्या शेतकर्‍यांच्या या प्रखर आंदोलनामुळे निर्माते पराग पाटील व तरुण दिग्दर्शक वरुण सुखराज अस्वस्थ झाले आणि त्यांनी या निषेध आंदोलनातले अनेक क्षण कॅमेऱ्यामध्ये पकडले. सर्वसमावेशकता, सहभागातली समानता आणि आंदोलनाचा ठहराव यामुळे समकालीन राजकीय व सामाजिक पटलावर विशिष्ट सामूहिक विचारांच्या अभिव्यक्तीचे एक अभूतपूर्व उदाहरण म्हणून या आंदोलनाकडे पाहता येईल.

चळवळीचे दस्तऐवजीकरण करण्याच्या प्रक्रियेत सर्वांगीण दृष्टिकोनाचे आकलन करून वास्तवाचे अनेक छुपे कोपरे शोधण्यात हे फिल्ममेकर यशस्वी झाले आहेत. हा माहितीपट या टीमने सहानुभूतीपूर्वक कॅप्चर केलेल्या कथांबीजांचा समूह आहे. कोविड-१९ च्या संकटांमध्येही सुरुवातीपासून या आंदोलनाच्या फील्डवर असणे हे एक मोठे आव्हान होते. अनोखी पब्लिकेशन्सच्या टीमने ३७८ दिवस चाललेला हा शांततापूर्ण, अहिंसक विरोध समजून घेत तो या ‘टु मच डॉक्युमेंटरी’ या फिल्मद्वारे सक्षमपणे सादर केला आहे. एका बलाढ्य दमनशक्तीच्या विरोधात बळीराजाची ही अहिंसक लढाई पाहणे हा थरारक अनुभव आहे.

या प्रदर्शनास रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.