मुंबई : एखाद्या विशिष्ट ठिकाणी राहणारे रहिवासी आणि नागरिक यात एक फरक आहे. रहिवासी होणं ही काही मोठी गोष्ट नव्हे, तर तुम्ही उत्तम नागरिक आहात का, हे पाहणे जास्त महत्वाचे ठरते. माणसाने नेहमी याचकाच्या भूमिकेत राहण्यापेक्षा द्यायला शिकले पाहिजे, तर त्या जगण्याला किंमत येते, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्मधिकारी यांनी मांडले.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांना पुरस्कार देण्यात आले. ठाणे येथील विजया शिंदे, स्वतःच्या पुढाकारातून मराठवाड्यात महिला संघटन वाढवून असंख्य सांस्कृतिक आनंद मेळाव्याचे आयोजन करणाऱ्या बीड येथील कमल बारुळे, समाजात एकता, न्याय आणि समतेचे बंध आपल्या कार्यातून विणणारे पुणे येथील ज्ञानेश्वर खरात, धरण क्षेत्रातील असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी कायद्यांच्या चौकटीत राहून न्याय मिळवून देणारे कोल्हापूर येथील सोमनाथ गवस, गांधी आणि विनोबा भावे यांच्या पथदर्शी विचारांवर चालणारे अकोला येथील विनायक बोराळे यांना 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक कृतज्ञता पुरस्कार' प्रदान करण्यात आला तसेच यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक संघ/संस्था कृतज्ञता सन्मान जळगाव येथील ज्येष्ठ नागरिक संघास प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. फेस्कॉमचे अध्यक्ष अण्णासाहेब टेकाळे, मुंबईच्या माजी महापौर ॲड. निर्मला सामंत प्रभावळकर चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले, विजय कान्हेकर, ॲड.प्रमोद ढोकले, दिपिका शेरखाने यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

या मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध गुणदर्शन, सुगम संगीत, नृत्य आदी उपक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.