मुंबई: भारतीय पत्रकारिता दिवसानिमित्त यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे रविवार, १६ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील महिला पत्रकारांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविकात प्रसारमाध्यमांमधील विशाखा समितीचे वास्तव तपासण्याची गरज व्यक्त केली. महिलांसाठी पत्रकारिता हे क्षेत्र आव्हानात्मक आहे, खूप कष्ट आणि अडचणी आहेत, परंतु सद्यस्थितीत महिला पत्रकारांची संख्या वाढली असल्याचे आशादायक चित्र या संमेलनातील दिवसभराच्या विविध चर्चासत्रांमधून समोर आले. यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पार पडलेल्या या संमेलनात महिला पत्रकारांच्या विविध प्रश्नांवरही प्रकाश टाकण्यात आला.
या संमेलनात राज्यभरातून अनेक महिला पत्रकार आणि पत्रकारितेच्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. दिवसभर चाललेल्या या संमेलनात महिला संपादक आणि पत्रकारांना काम करताना येणाऱ्या आव्हानांसोबतच पत्रकारितेत एआयचा वापर आणि सुरक्षा यावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.
चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी प्रास्ताविक भाषणात महिला पत्रकारांनी स्वतःला ‘महिला पत्रकार’ अशा चौकटीत न ठेवता “मी पत्रकार आहे” ही ओळख अंगीकारावी, असा संदेश दिला. “महिला पत्रकारांना सुरक्षित आणि सक्षम कामाचे वातावरण देणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे,” असे त्यांनी नमूद केले. तसेच एआयच्या वाढत्या वापराबाबत काही ठोस धोरण ठरवण्याची गरज व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक राही भिडे यांचा पत्रकारितेतील योगदानाबद्दल गौरव करण्यात आला. त्यांनी अडचणींचा विचार न करता महिला पत्रकारांनी काम केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. संमेलनाच्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ पत्रकार कल्पना शर्मा यांनी महिला पत्रकारिता: काल, आज आणि उद्या या विषयावर भाष्य करताना नैतिकता ते ब्रँड मॅनेजरपर्यंत झालेल्या पत्रकारितेच्या प्रवासाबद्दल परखड मत मांडले. कुपोषण, दारिद्र्य, आदिवासींचे प्रश्न, झोपडपट्ट्यांची उद्ध्वस्तता या मूलभूत समस्या ‘विकत नाहीत’, म्हणून मुख्य पानावर जागाच मिळत नाही, हे त्यांनी नमूद केले.
ग्राउंड रिपोर्टिंग करताना येणारे अनुभव या चर्चासत्रात विनया देशपांडे, शुभांगी पालवे, प्राची कुलकर्णी आणि शिरीन दळवी यांनी रिपोर्टिंग करताना महिला म्हणून कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागते याबद्दल भाष्य केले. तसेच विनया आणि शुभांगी यांनी संरक्षण पत्रकारितेबद्दल मार्गदर्शन केले.
‘मराठी पत्रकारितेत वरिष्ठ पदावर महिला अजूनही मर्यादित’ या सत्रात मृणालिनी नानिवडेकर, अरुंधती रानडे, जान्हवी पाटील आणि मानसी फडके यांनी कारणमीमांसा केली.
पत्रकारितेत एआयचा शिरकाव, वापर आणि सुरक्षा या विषयावर विदुला टोकेकर आणि मुक्ता चैतन्य यांनी मार्गदर्शन केले. भारतातील लोकांचा इंटरनेटचा वापर प्रचंड आहे. त्यामुळे माध्यम शिक्षण मुख्य शिक्षणात समाविष्ट होणे गरजेचे आहे. परिणामी खोटी माहिती नियंत्रित होईल आणि लोकांना माध्यमाचा सुरक्षित वापर करता येईल, असे मत मुक्ता चैतन्य यांनी व्यक्त केले. तर विदुला टोकेकर यांनी एआय टूलचा वापर आपल्या कामात कसा करता येऊ शकतो यावर मार्गदर्शन केले.
महिला पत्रकारांना काम करताना येणारी आव्हाने या परिसंवादात प्रीती सोमपुरा, स्वाती नाईक, मोहिनी जाधव आणि सुकेशनी नाईकवाडे यांनी त्यांचे काम करतानाचे भीषण अनुभव मांडले. याच सत्रात महिला पत्रकारांना कामाच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणींवर विशाखा समितीची मदत कशी होऊ शकते यावर अनघा सरपोतदार यांनी मार्गदर्शन केले.
संमेलनाच्या समारोप प्रसंगी सीएनबीसीच्या कन्सल्टिंग एडिटर लता व्यंकटेश यांनी न्यूज चॅनलमध्ये ताण कसे हाताळले जाते आणि बातमीचे पुरावे असणे किती महत्त्वाचे आहे याबद्दल माहिती दिली. तर लोकसत्ता चतुरंगच्या फिचर्स एडिटर आरती कदम यांनी पुरवणीचे विषय लिंगनिरपेक्ष कसे आखले जातात याबद्दल विचारमंथन केले.
या संमेलनातील परिसंवादात ज्येष्ठ पत्रकार आणि फिचर्स एडिटर संध्या नरे-पवार, ज्येष्ठ पत्रकार प्रणाली बाणखेले आणि ज्येष्ठ पत्रकार अलका धुपकर यांनी संवादक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. एमजीएम विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड मीडियाच्या प्राचार्या रेखा शेळके यांनी उद्घाटन सत्र आणि संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. एमजीएम विद्यापीठाचे कॉलेज ऑफ कम्युनिकेशन अँड मीडिया हे महिला पत्रकार संमेलनाचे नॉलेज पार्टनर होते. तर मुंबई मराठी पत्रकार संघ आणि टीव्हीजे यांनी या संमेलनाला सहयोग दिला.




