यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे आयोजित दिव्यांग सक्षमीकरण परिषदेत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली अपेक्षा

मुंबई : दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासावर व खऱ्या अर्थाने पुनर्वसनावर भर देत वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर आपण दिव्यांगांसाठी काय करू शकतो, यावर गांभीर्याने कृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे, असे मत यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मांडले. दिव्यांगांबद्दलच्या आवश्यक त्या सर्व बाबी सुरळीत झाल्या तरच खऱ्या अर्थाने दिव्यांगांचे सक्षमीकरण होईल, असे सांगत यासाठी आपण सर्वतोपरी सहाय्य करू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे दिव्यांग - सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषद पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. परांजपे स्कीम्सचे व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. चार सत्रांत पार पडलेल्या या एक दिवशीय परिषदेत निर्मलाताई सावंत प्रभावळकर, अभिजित मुरुगकर, डाॅ कल्याणी मांडके, डाॅ. समीर दलवाई, भक्ती वाळवे, हेमराज पारकर, वारस पटेल, राजश्री गावडे, ख्याती शेखर, अमेय अग्रवाल, अमिषा प्रभू, विधी शहा, डाॅ. अनघा तेंडुलकर-पाटील, ॲड. प्रमोद ढोकले, दत्ता बाळसराफ, अभिजीत राऊत, दिपिका शेरखाने यांच्यासह चव्हाण सेंटरचे अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

यशवंतराव चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आम्ही समाजासाठी सातत्याने कार्यरत आहोत, असे स्पष्ट करून खासदार सुप्रिया सुळे यांनी यावेळी चव्हाण सेंटरच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्या म्हणाल्या, 'समाजातील प्रत्येक घटकाला न्याय आणि अधिकार मिळवून देण्याचा, आमचा प्रयत्न आहे. आजच्या सरकारमध्ये समन्वय नसल्याचे दिसते. तुम्ही लोकांच्या जीवनात एक चांगला बदल घडवण्यासाठी सत्तेत आला आहात, याची जाणीव असायला हवी. दिव्यांग मंत्रालयाची अवस्था बिकट झाली आहे. यंत्रणा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. ती शेवटपर्यंत पोहोचावी यासाठी आपण काय करु शकतो, यावर चर्चा व्हायला हवी. डीबीटी असो किंवा या विभागाचे बजेट असो याविषयी देखील सविस्तर चर्चा व्हायला हवी', सरकारकडे मेट्रोसाठी हजारो कोटी आहेत तर मग मुलांसाठी काही कोटी रुपये का दिले जात नाहीत, असा प्रश्नही खासदार सुळे यांनी यावेळी उपस्थित केला.

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या पाहून परांजपे स्कीम्स २००० सालापासून अथश्री विशेष गृहबांधणी संकल्पना राबवत आहे, अशी माहिती यावेळी परिषदेचे प्रमुख पाहुणे शशांक परांजपे यांनी दिली. एकटे राहाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या जीवनशैलीनुसार किंवा गरजेनुसार उपयोग होईल, अशा घरांची निर्मिती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ज्यांचे हातपाय चालत नाहीत किंवा त्यांना तशा स्वरूपाचा आजार झाला आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांना आमच्या इन्स्टिट्यूटचा चांगला फायदा होत आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये जवळपास २ हजार कुटुंबे आमच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये राहत आहेत. त्यांचे जीवनमान सुलभ झाले आहे. इतकेच नाही तर आमच्या प्रोजेक्ट पासून प्रेरणा घेत देशभरात वेगवेगळे प्रकल्प उभे रहात आहेत, याचा आनंद आहे, असेही परांजपे यांनी यावेळी नमूद केले.

दिव्यांग - सक्षमीकरण परिषद आयोजित करण्यामागील भूमिका चव्हाण सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी विषद केली. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते यावेळी चव्हाण सेंटरच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'ज्येष्ठांचा पथदर्शक' या पस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. समन्वयक अभिजीत राऊत यांनी पुस्तक परिचय करून दिला, तर अनघा तेंडुलकर पाटील आणि अॅड. प्रमोद ढोकले यांनी दिव्यांग व्यक्तींसाठीच्या विविध योजना आणि सवलतींबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंतराव चव्हाण सेंटरचे संयोजक विजय कान्हेकर यांनी केले.

चार सत्रांत झालेल्या या परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ज्ञानी मार्गदर्शन केले. डॉ. समीर दलवाई, मा. डॉ. कल्याणी मांडके, आणि भक्ती वाळवे यांनी दिव्यांगत्वावर लवकर निदान व उपचार याबद्दल तंत्रशुद्ध माहिती दिली. दिव्यांगत्व येऊच नये, किंवा दुर्दैवाने आले तर त्याची व्याप्ती वाढू नये यासाठी, वेळीच निदान करणे व उपचार घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक एकाग्रता व इतरही काही मानसिक व्याधींवर पाश्चात्य - उपचार पद्धती योग्य नसून मुलांमध्ये वस्तू - मग्नतेपेक्षा मनुष्य - मग्नता कशी वाढेल, याबाबत पालकांनी काळजी घ्यावी, असे यावर डॉ. समीर दलवाई यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रामध्ये अमेय अग्रवाल यांनी शिक्षण, कौशल्य, रोजगार याबाबत आकडेवारी सहित संपूर्ण आराखडा मांडला‌. तळागाळापर्यंत दिव्यांगांचे सर्वेक्षण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीची जबाबदारी आपण कशा प्रकारे पार पाडली पाहिजे याबद्दल त्यांनी सूचित केले.

दिव्यांगांचे कौशल्य आणि शिक्षण पाहून त्यांना विविध उपक्रमांमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत धनंजय भोळे यांनी मांडले. अमिषा प्रभू यांनी त्यांच्या संस्थेमार्फत विविध कंपन्यांमध्ये, शासकीय, निमशासकीय संस्थांमध्ये दिव्यांगांना रोजगार मिळवून दिल्याचे सांगितले. याशिवाय शैक्षणिक पात्रता बघून आम्ही दिव्यांगांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध आहोत, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. प्रज्ञा कनौजिया यांनी दिव्यांगांसाठी असलेलूं कॉम्प्युटर कोर्सेसबद्दल माहिती दिली तर डॉ. अनिल पाझारे यांनी ग्रंथालयाबद्दल सविस्तर माहिती दिली. हेमराज पारकर, वारस पटेल, राजवी गावडे आणि ख्याती शेखर यांनी यावेळी सोल्विथॉन सादर केले. अत्याधुनिक अशा AI (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून दिव्यांगांच्या क्षेत्रातील विविध प्रश्नांना सोडविण्याचा सुलभ मार्ग सापडला आहे. याकडे सारंग नेरकर आणि अभिजीत मुरुगकर यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.

तिसऱ्या सत्रामध्ये आरोग्य - विमा, दिव्यांगांचे प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) यासंदर्भातील तांत्रिक अडचणी काय आहेत याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली. चव्हाण सेंटर मार्फत विविध स्तरांवर दिव्यांगांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. शासन स्तरावर यासाठी पाठपुरावा केला जातो. तसेच केंद्र व राज्य सरकार मार्फत दिव्यांगांना मिळणाऱ्या सेवा व सुविधांमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी विविध प्रकारचे बदल करून कायदे करण्यात येतात. त्यांची माहिती देण्यात आली. दिव्यांगांच्या आरोग्य - विम्यासाठी निरामय योजना, युनायटेड इन्शुरन्स, समावेशी सुरक्षा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आणि इतरही बऱ्याच पोर्टल द्वारे आरोग्य - विमा उपलब्ध असल्याचे अभिजीत राऊत व डॉ. रुपेश आव्हाळे यांनी यावेळी सांगितले.

चौथ्या सत्रात दिव्यांगांसाठी असलेल्या सवलती व योजना तसेच सर्वेक्षण याबद्दल विधी शहा यांनी मार्गदर्शन केले. दिव्यांगांना मोफत शिक्षण, शिष्यवृत्ती आदिद्वारे रोजगार उपलब्ध करून सक्षम करता येते, असे त्यांनी नमूद केले. अभिजीत मुरूगकर यांनी यावेळी बोलताना दिव्यांगांना सार्वजनिक ठिकाणी सहज व सुलभ प्रवेश मिळावा हा त्यांचा नैतिक अधिकार आहे, असे स्पष्ट केले यासाठी सुप्रीम कोर्टानेसुद्धा पावले उचलली आहेत. कायदा केला आहे. मात्र आजपर्यंत त्याची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. परिषदेतील प्रत्येक चर्चासत्रानंतर उपस्थितांना खुली चर्चा व प्रश्नोत्तरांची सर्वांना संधी देण्यात आली. दिपिका शेरखाने यांनी सूत्रसंचालन केले.