मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटर येथे "ज्येष्ठांचा पथदर्शक" या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे व मान्यवरांच्या हस्ते पार पडले.

याप्रसंगी लेखक डाॅ.अनघा तेंडुलकर पाटील आणि ॲड. प्रमोद ढोकले यांच्यासह निर्मलाताई सामंत प्रभावळकर, शशांक परांजपे, अभिजित मुरुगकर, डाॅ कल्याणी मांडके, डाॅ. समीर दलवाई, भक्ती वाळवे, हेमराज पारकर, वारस पटेल, राजश्री गावडे, ख्याती शेखर, अमेय अग्रवाल, अमिषा प्रभू, विधी शहा, दत्ता बाळसराफ, विजय कान्हेकर, प्रकाशक सतिश पवार, अभिजीत राऊत, दिपिका शेरखाने, यासह चव्हाण सेंटरचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचा आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक विभाग हिरीरीने कार्यरत आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी उपलब्ध असणाऱ्या कल्याणकारी योजना, कायदे व सोयी सवलती याविषयीची जनजागृती वेगवेगळ्या उपक्रम आणि कार्यशाळेच्या माध्यमांतून केली जाते. तसेच त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आनंद मेळावा, ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय सन्मान आयोजित करण्यात येते. ही कामे लक्षात घेऊन चव्हाण सेंटरने ‘ज्येष्ठांचा पथदर्शक’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसंबंधीचे संयुक्त राष्ट्र संघटनेचे धोरण, केंद्र आणि राज्य सरकारचे ज्येष्ठ नागरिक धोरण याची माहिती,सायबर फ्रॉड पासून कसा बचाव करावा, इच्छापत्र व वैद्यकीय इच्छापत्र कसे बनवावे, वार्धक्यातील व्याधींवरील नवीन तंत्रज्ञाने केलेली मात, डिजिटल तंत्रज्ञान ज्येष्ठांसाठी कसे आणि किती उपयुक्त आहे याची माहिती, डिमेंशिया,अल्झायमयर इत्यादी व्याधींमध्ये फीजिओथेरपीचे महत्व, आरोग्य आणि आहार विषयक टिप्स, संपत्ती आणि जीविताच्या रक्षणासाठी मातापिता आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या निर्वाहाचा आणि कल्याणाच्या कायद्याचा वापर कसा करावा अश्या अनेक महत्वाच्या विषयांवर हे पुस्तक प्रकाश टाकते. या पुस्तकात दिलेल्या माहितीनुसार आपण स्वतःचे इच्छापत्र व वैद्यकीय इच्छापत्र घरच्या घरी बनवू शकतो. ज्येष्ठांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची उकल यात लेखकांनी केल्याने ज्येष्ठांनी हे पुस्तक संग्रही ठेवावे असे झाले आहे, अशी माहिती प्रकाशकांनी दिली. त्याचबरोबर हे पुस्तक सर्वांनी वाचावे, असे आवाहन करण्यात आले.

मराठी आणि इंग्लिश ही दोन्ही पुस्तके ॲमेझॉनवर उपलब्ध आहेत तसेच 9075496977 या नंबरवर फोनद्वारे किंवा व्हॉट्सॲप द्वारे संपर्क करून पुस्तके मागवू शकता, असे प्रकाशकांनी सांगितले.