मुंबई : 'सध्यस्थितीत भारताचे शेजारील राष्ट्रांशी मित्रत्वाचे संबंध निदर्शनास येत नाहीत. तसेच चीन, पाकिस्तान आणि आता बांग्लादेशसोबतही काही मुद्द्यांवरून कटुता वाढलेली आहे. त्यामुळे भारताने परराष्ट्र धोरणाचा नव्याने आणि गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे', असे प्रतिपादन माजी राज्यसभा खासदार व ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले.

यशवंतराव चव्हाण सेंटर, प्रथम आणि एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईतर्फे माजी सनदी अधिकारी दिवंगत शरद काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शनिवारी १९ ऑक्टोबर रोजी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या रंगस्वर सभागृहात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुमार केतकर यांनी 'भारत आणि जग : सद्यःस्थिती' या विषयासंदर्भात विविध संदर्भ देत सविस्तर माहिती दिली. यशवंतराव चव्हाण सेंटरचे विश्वस्त अजित निंबाळकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर शरद काळे यांच्या पत्नी सुनीती काळे, कन्या सुचित्रा काळे, हेमंत टकले, राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, विजय केळकर आदी उपस्थित होते.

दरम्यान, 'भारतातील युवा पिढी हुशार असून बहुसंख्य नागरिक सुशिक्षित आहेत. मात्र जागतिक घडामोडी त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. भारताच्या बाहेर नेमके काय घडत आहे? याबाबत त्यांना सविस्तर माहिती पोहोचणे आवश्यक आहे. युवा पिढीने व सुशिक्षित नागरिकांनी जागतिक घडामोडींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. जेव्हा आपण भारत आणि जगासंदर्भात चर्चा करतो, तेव्हा भविष्यात नेमके काय घडेल याबाबत कोणी स्पष्टपणे सांगू शकत नाही', असे केतकर म्हणाले.