शेती, शिक्षण, साहित्य हे चव्हाण सेंटरचे अत्यंत महत्त्वाचे उपक्रम आहेत. त्यातून लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळते. शेती, शिक्षण, साहित्य क्षेत्रात नावीन्यपूर्ण काम करु पाहणाऱ्या, ध्येयवादी तरुण-तरुणींना हक्काचं व्यासपीठ यशवंतराव चव्हाण सेंटरने उपलब्ध करून दिले याचे मोठे समाधान आहे, असे प्रतिपादन श्री. शरद पवार यांनी केले. कृषी, शिक्षण, साहित्य क्षेत्रांत नव्या उमेदीने काम करणाऱ्या युवा-युवतींना 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप' प्रदान सोहळा श्री. शरदराव पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ श्री. अनिल काकोडकर उपस्थित होते.

आपल्या प्रास्ताविक भाषणात फेलोशिपची पार्श्वभूमी विषद करताना चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, यशवंतराव चव्हाण सेंटरच्यावतीने अनेक कार्यक्रम घेतले जातात, वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात. हे करत असताना कृषी, शिक्षण, साहित्य अशा काही महत्त्वाच्या क्षेत्रात काही वैशिष्ठ्यपूर्ण काम करण्याची इच्छा ज्या तरुणांमध्ये आहे त्यांचा शोध घेऊन त्यांना त्या त्या क्षेत्रात भरीव कार्य करण्यास प्रोत्साहित करण्याच्या दृष्टीने एखादी योजना असावी या विचारातून फेलोशिपची कल्पना पुढे आली. त्यानुसार पवार साहेबांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदीप्यमान कारकिर्दीला मानाचा मुजरा करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर'च्या वतीने २०२१ मध्ये ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली या फेलोशिपची सुरुवात झाली. सर्व जिल्ह्यांना समप्रमाणात फेलोशिप मिळावी म्हणूनच ह्या फेलोशिपचे काम पारदर्शकपणे केले जाते. महाराष्ट्रातील प्रत्येक गुणवंताला इथे समान संधी मिळू शकते. ही फेलोशिप मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचं अगदी पहिल्या दिवसापासून सर्व डॉक्युमेंटेशन होत आहे. त्यामुळे भविष्यातल्या फेलोंसाठी एक आदर्श वस्तूपाठ उभा राहिल. त्या पुढे म्हणाल्या, हा एक द्विमार्गी प्रवास आहे. युवा शक्तीचा योग्यप्रकारे वापर केल्यास महाराष्ट्र हे देशातील प्रातिनिधिक राज्य बनेल. 'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप'च्या माध्यमातून महाराष्ट्रात सुरू झालेली ही विकासाची नांदी आहे. शेती, शिक्षण, साहित्य क्षेत्रात काम करणारे अनेक उत्साही लोक आहेत, त्यांना प्रोत्साहन दिले, काम करण्याची व कर्तृत्व दाखवण्याची संधी दिली तर ते जीवनात यशस्वी होतात. आज तुम्ही ज्या क्षेत्रात काम केले त्याबद्दल तुम्हाला सन्मानित करण्यात आले. माझी आग्रही विनंती आहे की हे काम तुम्ही चालू ठेवा, सतत नवीन करण्याची कल्पना डोक्यात ठेवा, चव्हाण सेंटर त्यासाठी कायम मदत करील. अपयश आले तरी त्यावर मात करण्याची हिंमत ठेवा यातून तुम्ही यशस्वी व्हाल ही माझी खात्री आहे. फेलोशिपसाठी निवड झालेल्या सर्व फेलोंचे त्यांनी अगत्यपूर्वक अभिनंदन केले.

'शरद पवार इन्स्पायर फेलोशीप' निवड समितीचे अध्यक्ष, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ श्री. अनिल काकोडकर म्हणाले, ‘एसपीआयएफ’ ही सामाजिक आणि राष्ट्रीय परिवर्तन कारणारी गोष्ट आहे. भारतात येऊ घातलेली नवीन शिक्षण प्रणाली ‘एसपीआयएफ’शी सुसंगत आहे. भारतीय बाजारपेठ मुल्यवर्धक व्हावी यासाठी फेलोंनी प्रयत्न करायला पाहिजेत. अशा फेलोशिपच्या माध्यमातून देशात अमूलाग्र बदल घडू शकेल.

शरद पवार इन्स्पायर फेलोशीप अंतर्गत कृषी (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर), साहित्य (शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन लिटरेचर) आणि शिक्षण (शरद पवार इन्स्पायर फेलोशीप इन एज्युकेशन) या क्षेत्रातील गुणवंतांना भविष्यकाळातील नेतृत्वासाठी प्रेरीत केले जाते.

फेलोशिपला तिसऱ्या वर्षीही भरघोस प्रतिसाद मिळाला. चव्हाण सेंटरच्या निवड समितीने २०२३-२०२४ च्या तिसऱ्या तुकडीसाठी ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन ॲग्रीकल्चर’ साठी ८०, ‘शरद पवार साहित्य फेलोशिप' साठी १२ व ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशन’साठी ४० अशा एकूण १३२ फेलोंची निवड केली. या सर्वांना शरद पवार यांच्या हस्ते फेलोशिप सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली.

कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, राजेंद्र पवार, प्रा. निलेश नलावडे व सह्याद्री फार्म्स नाशिक तसेच शिक्षण फेलोशिपसाठी एमकेसीएल फाउंडेशन व विवेक सावंत यांचे सहकार्य मिळत आहे. कृषी क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रोफेसर निलेश नलावडे, साहित्य क्षेत्रातील फेलोशिपसाठी प्रा. नितीन रिंढे तर शिक्षण क्षेत्रातील फेलोशिपसाठी विवेक सावंत हे मुख्य समन्वयक म्हणून मार्गदर्शन करत आहेत.

याप्रसंगी मागील वर्षीच्या फेलोंनी फेलोशिपबद्दलचे अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुसऱ्या तुकडीतील फेलो श्री. समर्थ तुपकर यांनी केले.

चव्हाण सेंटरच्या सीईओ दिप्ती नाखले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यशवंतराव चव्हाण सेंटरचे सरचिटणीस श्री. हेमंत टकले यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी फेलोशिपच्या सल्लागार समितीचे सदस्य मा. डॉ. विलास शिंदे, मा. डॉ. शंकरराव मगर, मा. डॉ. प्रशांत कुमार पाटील, मा. डॉ.अजित जावकर, मा. आभा लांबा, श्री. नरेंद्र मुरकुंबी, प्रो. निलेश नलावडे, प्रा. नितीन रिंढे, तसेच निवड समितीचे सदस्य, सर्व फेलोज् व त्यांचे कुटुंबीय आदी मान्यवर उपस्थित होते.