यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार ’ दिला जातो. यावर्षीचा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांना जाहीर झाला आहे. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंतीदिनी म्हणजेच १२ मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा आयोजित केला असून चव्हाण सेंटरचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.
चव्हाण सेंटरच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय एकात्मता, लोकशाहीमूल्ये तसेच सामाजिक-आर्थिक या क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य करणा-या नामवंत व्यक्तीला 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' देण्यात येतो. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा पुरस्कार दिला जातो. सन्मानपत्र व पाच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
डॉ. सौम्या स्वामीनाथन या बालरोगतज्ज्ञ आहेत. क्षयरोग, एचआयव्ही या क्षेत्रातील संशोधनात गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून त्या कार्यरत आहेत. भारत सरकारचे सचिव आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. डॉ. स्वामिनाथन या अनेक संस्थांच्या राष्ट्रीय आणि जागतिक सल्लागार आहेत. स्वीडनमधील कॅरोलिंस्का विद्यापीठ आणि बोस्टन, यूएसए मधील टफ्ट्स विद्यापीठ यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्या सहायक प्राध्यापक आहेत. आरोग्यक्षेत्रात जागतिक पातळीवर भारताची पताका उंच फडकत ठेवणाऱ्या शास्त्रज्ञांमध्ये डॉ. सौम्या स्वामिनाथन यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते.