मुंबई, दि. २५ नोव्हेंबर २०२६: यशवंतराव चव्हाण सेंटरप्रमाणेच ‘कोरो इंडिया’ ही संस्था समाजातील वंचित घटक आणि महिलांचे प्रश्न केंद्रस्थानी ठेवून कार्य करत आहे. चव्हाण सेंटरच्या संपर्कात राहून समाजाला साक्षर करण्याचे काम आम्ही सातत्याने करत आहोत. आम्ही सर्व कार्यकर्ते संविधानाची चौकट मानणारे असल्याने, चव्हाण सेंटरने दिलेला हा पुरस्कार म्हणजे एका कुटुंबानेच केलेला सन्मान आहे, असे मानून आम्ही त्याचा नम्रपणे स्वीकार करतो. लोकनेते यशवंतराव चव्हाणांच्या सुसंस्कृत, सर्जनशील आणि सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्वाबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पारितोषिकासाठी आमच्या संस्थेची निवड केल्याबद्दल चव्हाण सेंटरचे ऋण व्यक्त करतो, अशा भावना ‘कोरो इंडिया’चे कार्यक्रम संचालक महेंद्र रोकडे यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर व्यक्त केल्या. कोरोच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर लोकांची साथ असते आणि लोकसहभागातूनच समाजात शाश्वत बदल घडतो, असे प्रतिपादन संस्थेच्या कार्यक्रम व्यवस्थापक मुमताज शेख यांनी केले. तसेच, वंचित आणि तळागाळातील लोक हे एक ज्ञानभांडार असून, त्यास समाजाकडून योग्य मान्यता मिळाली पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी कृषी, औद्योगिक समाज रचना, व्यवस्थापन, प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक-सामाजिक विकास, मराठी साहित्य-संस्कृती, कला आणि क्रीडा यांपैकी कोणत्याही एका क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. रोख दोन लाख रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. याच कार्यक्रमात मुंबई विद्यापीठातून एल.एल.एम.च्या परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी दिला जाणारा ‘न्या. वाय. व्ही. चंद्रचूड पारितोषिक’ ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते ॲड. श्रीनिवास कस्तुरी यांना प्रदान करण्यात आला.
सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी आपल्या प्रास्ताविकात यशवंतराव चव्हाण सेंटरच्या स्थापनेमागील भूमिका स्पष्ट करत संस्थेच्या चार दशकांच्या कार्याचा आढावा घेतला. यशवंतराव चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राच्या कृषी-औद्योगिक धोरणाचा केवळ पायाच घातला नाही, तर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक संस्थांचे जाळेही निर्माण केले; ज्यामुळे महाराष्ट्र एक प्रगतिशील राज्य म्हणून ओळखले जाते. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून आम्ही संविधानाच्या वाटेने जात आहोत आणि कोरो इंडियाची भूमिका आमच्या विचारांशी अत्यंत सुसंगत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. तामिळनाडूमधील त्रिची शहराच्या पायाभूत सुविधा आणि तेथील शिक्षण व्यवस्थेचा दाखला देत, इतर राज्येही आता पुरोगामी महाराष्ट्राशी स्पर्धा करत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे चव्हाण सेंटरने प्रशासकीय व्यवस्थेत अधिक सक्रियपणे काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी वातावरण बदल, नर्मदा बचाव आंदोलन, कर्जत येथील अलीकडची वृक्षतोड, अंधश्रद्धा निर्मूलन आणि नाशिकमध्ये उघडकीस आलेली बुवाबाजी या मुद्द्यांवर भाष्य केले. सुशिक्षित लोक आणि आजची नवी पिढी म्हणजेच ‘जेनझी’देखील तंत्रज्ञान आणि श्रद्धेच्या विचित्र वळणावर अंधश्रद्धेच्या आहारी जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. धोरणनिर्मिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समतोल राखून भारत कसा पुढे जाईल, याचा विचार करणे आज गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. तंत्रज्ञान कितीही विकसित झाले असले तरी महिलांसाठी स्वच्छ स्वच्छतागृहांची उपलब्धता ही आजच्या काळातील मोठी क्रांती असल्याचे सांगत, कोरो इंडियाने या विषयावर महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले. आगामी काळात कोरो आणि चव्हाण सेंटरने एकत्र येऊन फेलोशिप आणि 'राईट टू पी' (Right to Pee) या उपक्रमांतून अधिक भरीव काम करावे, तसेच यशवंतरावांचे विचार आणि कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यात सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
याच सोहळ्यात सन २०२६ चा प्रतिष्ठेचा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर करण्यात आला. निवड समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी हेमलकसा आणि परिसरातील आदिवासी पट्ट्यात राबवलेली अग्रगण्य चळवळ तसेच नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या परिवर्तनकारी कार्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांना हा पुरस्कार जाहीर केला. या दाम्पत्याने आदिवासी जनतेला वैद्यकीय सेवा पुरवतानाच वन्यप्राण्यांचीही मायेने सेवा केली असून, त्यांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार डॉ. काकोडकर यांनी काढले. यापूर्वी डॉ. प्रकाश आमटे यांना २००२ मध्ये भारत सरकारने 'पद्मश्री' किताबाने, तर २००८ मध्ये डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे या दोघांनाही 'रॅमन मॅगसेसे' पुरस्काराने सन्मानित केले आहे.
चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुण गुजराथी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी सेंटरच्या कोषाध्यक्ष अदिती नलावडे, विश्वस्त डॉ. समीर दलवाई, बी. के. अग्रवाल, प्रा. विवेक सावंत, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार, लक्ष्मण माने, प्रभा कुलकर्णी, कोरो इंडियाच्या संस्थापक-संचालक सुजाता खांडेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सेंटरचे मानद कार्यक्रम व्यवस्थापक दत्ता बाळसराफ यांनी राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींचा संदर्भ देत कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन केले.




