मुंबई, दि. १२ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर साहित्य, शेती- पाणी पुरस्काराची घोषणा आज खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पुरस्काराचे हे दुसरे वर्ष असून चव्हाण सेंटर मुंबई येथे सेंटरचे अध्यक्ष शरद पवार आणि जैन फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी मुंबईत या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. राज्यातील साहित्य आणि शेती - पाणी क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सहा जणांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
कविवर्य ना. धों. महानोर यांच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या पुरस्कारांची घोषणा चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. पालघर येथील साधना उमेश वर्तक, नंदुरबार येथील कुसुम सुनील राहसे यांना कविवर्य ना. धों. महानोर शेती-पाणी पुरस्कार तर चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर, बुलढाणा येथील वैभव देशमुख, मराठवाडा येथील सुचिता खल्लाळ, पुणे येथील हिना कौसर खान यांना कविवर्य ना. धों. महानोर साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला.
शेती-पाणी आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात अत्यंत महत्वपूर्ण काम करत योगदान देणाऱ्या या सहा जणांना पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अशोक जैन, डॉ. जब्बार पटेल, डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. नितीन रिंढे, शंभू पाटील, अजित भुरे, पत्रकार रमेश जाधव इत्यादी मान्यवरांच्या निवड समितीने हे पुरस्कारार्थी निवडले आहेत, असे त्या म्हणाल्या. राज्यभरातील साहित्य आणि शेती-पाणी या क्षेत्रांतून अनेक जणांच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर हे सहा पुरस्कारार्थी निवडले असून यशवंतराव चव्हाण सेंटर आणि जैन फाउंडेशनच्या वतीने आपण त्यांचा सन्मान करत आहोत, असे त्यांनी नमूद केले.