शरद पवार, डॉ.जब्बार पटेल व मान्यवरांच्या चर्चासत्राचे आयोजन

मुंबई - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांच्या सन्मानार्थ 'सिंहासन' चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हे स्क्रीनिंग चव्हाण सेंटर येथे मंगळवार (दि. ११ एप्रिल) सायंकाळी पाच वाजता होणार असल्याची माहिती सेंटरकडून कळविण्यात आली आहे.

सिंहासन चित्रपटाला यंदा ४४ वर्षे पूर्ण होत आहेत.हा चित्रपट लेखक अरुण साधू यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या दोन कादंबऱ्यांवर आधारित असून, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल होते तर पटकथा विजय तेंडुलकर यांची होती.

या चित्रपटाच्या स्क्रीनिंगनंतर शरद पवार, जब्बार पटेल, मोहन आगाशे, नाना पाटेकर व मान्यवरांचे चर्चासत्र देखील होणार आहे. या मान्यवरांशी अंबरीश मिश्र आणि राजीव खांडेकर संवाद साधणार आहेत.

चव्हाण सेंटरच्या वतीने डॉ. जब्बार पटेल यांच्या सिनेक्षेत्रातील प्रदीर्घ अभिमानास्पद कामगिरीच्या सन्मानार्थ त्यांच्या सर्व चित्रपटांचे स्क्रिनिंग पुढील वर्षभरात करण्यात येणार असल्याची माहिती सेंटरकडून देण्यात आली. या स्क्रीनिंगसाठी सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे.