महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यातसुद्धा मुलींचे प्रमाण कमी होत आहे. महाराष्ट्रात १९९१ मध्ये मुलींचे प्रमाण दर एक हजार मुलांमागे ९४६ इतके व २००१ मध्ये ते ३३ ने कमी होऊन ९१३ झाले. तर २०११ च्या जनगणनेनुसार ते आणखी ३० ने कमी होऊन ते ८८३ एवढे झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून जन्माआधीच मुली मारल्या जातात ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे भविष्यात अनेक सामाजिक अडचणी निर्माण होणार आहेत.
या संदर्भात सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याकरिता ‘जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा…’ हा उपक्रम यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून साकार झाला आहे. स्त्री भ्रूणहत्येविरोधात हा उपक्रम प्रभावीपणे कार्य करत आहे. पुरोगामी महाराष्ट्राने देशात सर्वात प्रथम म्हणजे १९८८ साली लिंगनिवडीस प्रतिबंध करणारा कायदा केला होता, त्यानंतर केंद्र शासनाने २० सप्टेंबर १९९४ रोजी हा कायदा केला. सन २००३ मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली. या कायद्यांतर्गत गर्भलिंग निदान करण्यावर प्रतिबंध केला आहे.
हा उपक्रम राबविण्यासाठी दि. २५ ते २८ ऑगस्ट २०११ दरम्यान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावापासून (नायगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) एका भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील हजारो युवतींसमवेत सुप्रिया सुळे यांची ही ऐतिहासिक पदयात्रा नायगाव ते पुणे अशी पार पडली. दि. २८ ऑगस्ट २०११ रोजी राज्यभरातील पाच हजारांहून अधिक युवतींच्या उपस्थितीत व सेंटरचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय युवती परिषद पार पडली.
प्रचंड उत्साहात संपन्न झालेल्या या पदयात्रेने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष संबंधित प्रश्नाकडे वेधले गेले. उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा, खानदेश व विदर्भातही अशा प्रकारच्या युवती रॅली व युवती परिषद घेण्यात आल्या. ‘जागर’ उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात औरंगाबाद येथून करण्यात आली. मंगळवार, दि. ३ एप्रिल २०१२ रोजी गजानन महाराज मंदीर चौक ते एम. जी. एम. परिसर अशा सुमारे ३ कि.मी.ची ही रॅली युवतींच्या प्रचंड उत्साहात पार पडली.
स्त्रीभ्रूण हत्येविरोधी संदेश राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात पोहचविण्याकरीता ही रॅली यशस्वी ठरली. सुमारे अडीच हजार युवतींचा सहभाग असणारी शहरातील नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यातील ही पहिलीच रॅली होती. विविध सामाजिक संस्था व संघटना, विविध महाविद्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग, हजारो युवतींचा सहभाग या रॅलीचे मुख्य आकर्षणबिंदू ठरला. एम. जी. एम. परिसरातील रुक्मिणी सभागृहात सदर रॅलीचा समारोप युवती परिषदेने करण्यात आला. या परिषदेत युवतींनी खा. सुप्रिया सुळे यांच्याशी मुक्त संवाद साधला. या अनुषंगाने, चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'जागर' फिल्म दाखविण्यात आली.
त्यानंतर गुरुवार, दि. ५ एप्रिल २०१२ रोजी नागपूर येथे भव्य युवती रॅली व परिषदेचे आयोजन करण्यात आले. युवतींनी या रॅलीत सहभाग नोंदवत स्त्रीभ्रूण हत्याविरोधी जागर केला. ‘जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा’ हे ब्रीद लिहीलेल्या पांढऱ्या टोप्या युवतींनी धारण करत या सामाजिक जागृतीच्या उपक्रमात सहभागी झाल्या. या रॅलीत पाच घोडेस्वार युवती अग्रस्थानी होत्या. जागर गीताने संपूर्ण नागपूर आणि पर्यायाने संपूर्ण विदर्भ ढवळून निघाला. सकाळी ८ वाजता ही रॅली नागपूर शहरातील चिल्ड्रेन सिग्नल पार्क येथून आसमंताला गवसणी घालून सुरु झाली. 'जागर हा जाणिवांचा. तुमच्या माझ्या लेकींचा..’ हा संदेश लिहलेले फलक फुग्यांसोबत हवेत सोडण्यात आले आणि रॅलीची सुरुवात झाली.
मराठवाडा आणि विदर्भाच्या प्रचंड यशानंतर अशीच दिमाखदार रॅली नाशिक येथे घेण्यात आली. बुधवार, दि. ११ एप्रिल २०१२ रोजी सकाळी ८ वाजता हुतात्मा स्मारकापासून सुरु झालेली रॅली कालीदास कलामंदीर येथे समाप्त झाली. सांडणीस्वार, घोडेस्वार युवती या रॅलीचे आकर्षण होते, तसेच आदीवासी नृत्य, लेझीमपथक, मानवी मनोरे विविध वेशातील युवती, सजीव देखावे यांनी सजलेली युवती रॅली म्हणजे नाशिककरांसाठी 'न भूतो न भविष्यती' अशी पर्वणी होती. केवळ युवतीच नव्हे तर महिलावर्ग, विविध संस्था व संघटनांचा सहभाग या रॅलीत होता. जागरचा संदेश संपूर्ण राज्यभर पसरविण्याकरीता झालेल्या तीनही ठिकाणाच्या रॅलींनी व परिषदांनी मोलाची कामगिरी केली.
‘जागर हा जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा…’ या उपक्रमांतर्गत आतापर्यंत विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. खा. सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, ग्रामविकासमंत्री, उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना या विषयी निवेदन सादर करण्यात आले. राज्यातील सर्व पक्षीय आमदार, खासदारांना पत्राद्वारे संपर्क करून जनजागृतीकरिता आवाहन करण्यात आले होते. तसेच राज्यातील विविध स्वयंसेवी संस्था व डॉक्टर्स संघटनांच्या प्रतिनिधींशीही वेळोवेळी चर्चा करण्यात येत आहे. ‘स्त्रीभ्रूणहत्या’ या विषयावर राज्यस्तरीय महाविद्यालयीन निबंध, चित्रकला आणि ठरावीक शहरांमध्ये वक्तृत्व व पथनाट्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या विषयाशी संबंधित संदर्भ पुस्तिकांचेही प्रकाशन करण्यात आले. आगामी काळात राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रबोधन मोहीम राबविण्यात येणार आहे. वेळोवेळी प्रबोधन, लोकसहभाग व प्रसंगी कठोर कारवाई करून कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. महिलांविषयी प्रचलित असलेल्या गैरसमजुती व गैरप्रथांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. विशेषतः युवा पिढीला या उपक्रमात सामील करून भविष्यात स्त्री भ्रूणहत्या होणार नाही, याकरिता त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न करण्याचा आमचा मानस आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून दबाव गट निर्माण व्हावा, यासाठी पुढाकार घेण्यात येत आहे. या संदर्भातील कायद्यांची प्रभावी अंमलबजावणीकरिता शासनाच्या मदतीने प्रशिक्षण, मेळावे, कार्यशाळांचे राज्यभर आयोजन करण्यात येणार आहे. स्त्री- शिक्षण प्रशिक्षण हे केंद्रस्थानी ठेवून विविध स्तरांतून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
स्त्रीभ्रूण हत्येला विरोध करण्यासाठी सुरु झालेला हा उपक्रम केवळ याच प्रश्नापुरता मर्यादीत न राहता एकूणच स्त्रीशिक्षण, महिला सशक्तीकरण अशा व्यापक स्वरुपात त्याची वाटचाल चालू आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने सुरु झालेला हा उपक्रम आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला पुरोगामी महाराष्ट्र निर्मीतीतले एक पाऊल आहे. या प्रश्नाच्या सोडवणूकीसाठी केवळ एक संस्था किंवा संस्थांचा गट पुरेसा नाही, तर समाजमनाची मानसिकता बदलण्यासाठी समाजातील प्रत्येक स्तरातील घटकाने या प्रश्नावर गांभीर्याने विचार करुन प्रश्न सोडवण्यासाठी सहभागी होऊन सहकार्य करणे आवश्यक आहे. सेंटरच्या वतीने सुरु झालेला हा उपक्रम स्त्रीभ्रूण हत्येसारख्या संवेदनशील विषयावर काम करण्याची नामी संधी आहे, असे आम्ही मानतो. या आणि अशा उपक्रमांमुळे पुरोगामी राज्याचे आजचे चित्र निश्चितच बदलून राज्याला नवी पुरोगामी, परिवर्तनवादी दिशा येईल, यात शंका नाही.