मा. श्री. शरदचंद्रजी पवार
अध्यक्ष

विद्यार्थी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून १९६० साली मी पुण्यात सक्रिय होतो. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. पदग्रहणानंतर चव्हाण साहेब शिवनेरीला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानी येणार होते. आम्ही सर्व कार्यकर्ते सायकलवरून शिवनेरीला पोहोचलो. चव्हाणसाहेबांचे सारे राजकारण शालीन आणि सुसंस्कृत होते. त्याला साजेसे ते बोलले, “संयुक्त महाराष्ट्राच्या निमित्ताने झालेला संघर्ष हा इतिहास आहे. तो संघर्ष विसरून आपण नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुटीनं उभं राहूयात.” असं कळकळीचे आणि भिडणारे आवाहन त्या भाषणात होते. ‘नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांची साथ हवी आहे’, अशी भावनिक साद त्यांनी घातली. त्याचा विलक्षण प्रभाव आमच्यावर पडला. पुढे अनेक दिवस त्यांचे आवाहन हाच आमच्यातल्या चर्चेचा विषय होता. त्या आवाहनातली आश्वासकता, महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी असणारी त्यांची तळमळ ऐकून, पाहून आमचे आयुष्यच ढवळून काढले. आमच्या विचाराला दिशा सापडली आणि तोच प्रभाव आजतागायत माझ्यावर टिकून आहे.

शेती, उद्योग यापासून साहित्य, संस्कृतीपर्यंत नव महाराष्ट्राच्या उभारणीचा संकल्प त्यांनी मांडला व तो सिद्धीस नेण्यासाठी त्यांनी आपले सर्व ज्ञान व कौशल्य पणास लावले. विविध यंत्रणा उभ्या केल्या, नव नेतृत्व विकसित केले त्यातून एक सुसंस्कृत आणि समृद्ध महाराष्ट्राची घडी बसवली. माझ्या सार्वजनिक जीवनात सुमारे पंचवीस वर्षांचा त्यांचा सहवास मला लाभला. २५ नोव्हेंबर 1984 साली चव्हाण साहेबांचे निधन झाले. त्यांचे विचार आणि त्यांच्या कार्याची स्मृति पुढे नेण्यासाठी १९८५ च्या सप्टेंबर मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई या संस्थेची स्थापना आम्ही केली. सुरुवातीच्या काळात स्व.वसंतदादा पाटील व यशवंतरावांच्या मार्गदर्शनाने उभा राहिलेल्या अनेक नेत्यांचे मार्गदर्शन आम्हास मिळाले. सुरुवातीच्या कालखंडात संस्थेने सहकार, पंचायत राज, पडीक जमीन विकास, अशा विविध क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील उपक्रम राबविले. त्यांतर शिक्षण, महिला, आरोग्य (दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक), युवा आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये गेल्या तीन दशकाहून अधिक काळ संस्था उत्तम व प्रभावीपणे कार्य करीत आहे.

कोरोना नंतरच्या काळात अनेक गोष्टी बदलल्या आहेत. संस्थेनेही या बदलाची चाहूल घेऊन नव्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. यशवंतरावांची जीवनदृष्टी व जीवनमूल्ये यांचा वसा खांद्यावर घेऊन नवी पिढी, संस्था अधिक कार्यक्षमतेने कार्यरत राहील, याबद्दल मला विश्वास वाटतो.

- शरद पवार