आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणं हे यशवंतराव चव्हाण सेंटर या संस्थेचं ध्येय ! सेवाभाव, सर्जनशीलता, उत्तरदायित्व, विश्वासार्हता, प्राविण्य ही मूल्यं जपत गेल्या चार दशकांहून अधिक काळ यशवंतराव चव्हाण सेंटरचा प्रवास सुरू आहे. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर यशवंतरावांचे अनुयायी, कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यातूनच १७ सप्टेंबर, १९८५ रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईची स्थापना झाली. म्हणजेच आताचे यशवंतराव चव्हाण सेंटर होय. या धर्मनिरपेक्ष, पक्षनिरपेक्ष मंचावर विविध सामाजिक प्रश्नांची चर्चा व्हावी आणि या माध्यमातून कार्य करणारी माणसं तयार व्हावीत या उदात्त ध्येयानं यशवंतराव चव्हाण सेंटरचा प्रवास अखंडपणे सुरु आहे.
शिक्षण, आरोग्य दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक, युवा, महिला, सांस्कृतिक विभाग तसेच यशवंतराव चव्हाण रिसर्च सेंटर ऑफ सोशल सायन्स, यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय, ग्रंथ प्रकाशन आणि माहितीपट, यशवंतराव चव्हाण माहिती व तंत्रज्ञान प्रबोधीनी, कायदेविषयक सहाय्य आणि सल्लाफोरम, आदिवासी विकास केंद्र अशा विविध विभागांतर्फे यशवंतराव चव्हाण सेंटर या संस्थेचं कार्य सुरू असून राज्याच्या विविध भागात चव्हाण सेंटरची जिल्हा केंद्र कार्यरत आहेत.
शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यातील नऊ हजारपेक्षा जास्त शिक्षक व तज्ज्ञ चव्हाण सेंटरला जोडलेले असून त्यांच्यासाठी शैक्षणिक परिषदा, शिक्षण कट्टा, शिक्षकांसाठी फेलोशीप, शिक्षक साहित्य संमेलन तसेच शैक्षणिक ग्रंथ निर्मिती, शिक्षण विषयक लिखाण केलेल्या उत्कृष्ट पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांना 'डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ ' पुरस्कार तसेच राज्यातील गुणवंत शिक्षकांना 'डॉ. कुमुद बन्सल गुणवंत शिक्षक ' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतं. “यशवंतराव चव्हाण रिसर्च सेंटर ऑफ सोशल सायन्सेस” हे मुंबई विद्यापीठाशी संलग्न संशोधन केंद्र सेंटरने सुरु केले आहे. या केंद्रात राज्यशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांत विद्यार्थ्यांना पीएचडीची पदवी प्राप्त करता येते.
आरोग्य विभागाच्या वतीने शोध आनंदी जीवनाचा, राज्यस्तरीय आरोग्य परिषद, ज्येष्ठ नागरिक व ज्येष्ठ नागरिक संघ अथवा संस्था यांना पुरस्कार, ज्येष्ठ नागरिकांसाठी जनजागृती कार्यशाळा, दिव्यांगांसाठी जनजागृती कार्यक्रम, दिव्यांगांसाठी शासकीय योजनेचा लाभ मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या युडीआयडी कार्ड वाटप, दिव्यांगांसाठी आरोग्य शिबिरे व सहाय्यभूत कृत्रिम साधनांचे वाटप यासोबतच कर्णदोष असलेल्यांसाठी मोफत डिजिटल श्रवणयंत्र तपासणी आणि वाटप यांसारखे उपक्रम या विभागाच्या माध्यमातून पार पडतात. यासोबतच या विभागाच्या वतीने दिव्यांग विवाह सोहळ्याचे देखील आयोजन करण्यात आले होते.
युवा पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी युवा अभिसरण, यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार, कृषी व साहित्य क्षेत्रातील युवांसाठी फेलोशिप, डिजिटल क्षेत्रातील कंटेंट क्रिएटर्ससाठी महाराष्ट्र क्रिएटर्स समिट, युवकांच्या सर्वांगीण विकासाठी कार्यशाळा, यशवंत वक्तृत्व स्पर्धा, लघुपट स्पर्धा, यशवंत युथ कॉन्क्लेव, महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा असे विविध उपक्रम युवा विभागातर्फे गेल्या तीन दशकांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहेत.
आर्थिक, सामाजिक आणि कायद्याचे ज्ञान या दृष्टीनं महिला सक्षम व्हाव्यात यासाठी यशस्विनी सामाजिक अभियान, आर्थिक साक्षरता अभियान यांसारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून कृतिशील प्रयत्न केले जातात. तसेच स्त्रीशक्तीला सलाम करण्यासाठी यशस्विनी सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला 'जागर जाणिवांचा, तुमच्या माझ्या लेकींचा' या उपक्रमाची महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात दखल घेतली गेली आहे. महाराष्ट्रातली खाद्य परंपरा लोकांना कळावी, रुजावी आणि टिकावी यासाठी गावरान खाद्य महोत्सव दरवर्षी भरवला जातो. महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी ‘सुगरण’ उपक्रमाच्या माध्यमातून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले जातात.
महिलांमध्ये कायद्याविषयीची जनजागृती निर्माण होण्यासाठी कौटुंबिक समस्या - समुपदेशन, कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन केंद्र राज्याच्या विविध भागात सुरू करण्यात आली आहेत. त्याचबरोबर महिला पत्रकारांचे प्रश्न समजून घेण्यासाठी राज्यस्तरीय महिला पत्रकारांच्या संमेलनाची २०२५ पासून सुरुवात करण्यात आली आहे.
चव्हाण सेंटरच्या वतीने राष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना 'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार' दिला जातो तर राज्य पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्यास 'यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पारितोषिक’ दिले जाते. सुमारे तीन दशकाहून अधिक काळ हा उपक्रम सुरु आहे.
कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या संकल्पनेतून युवा पिढीला प्रेरणा, प्रोत्साहन आणि योग्य मार्गदर्शन लाभावं यासाठी कृषी, शिक्षण आणि साहित्य अशा तीनही क्षेत्रात शरद पवार इन्स्पायर फेलोशिप सन २०२१ पासून सुरू करण्यात आली आहे. त्याला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय ग्रंथालय म्हणजे विविध विषयांवरील मौलिक ग्रंथांचा खजिनाच! महाविद्यालयीन विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक व सुजाण वाचक त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतात. अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब आणि कार्याध्यक्ष खासदार सुप्रियाताई सुळे यांना भेट म्हणून आलेली अनेक पुस्तकं सेंटरकडे जमा होत आहेत, ती पुस्तके वाचकांना केवळ पोस्टल खर्चात घरपोच करण्याचे काम पुस्तकदूत या उपक्रमाच्या माध्यमातून केलं जात आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरचे आदिवासी विकास केंद्र हे महाराष्ट्रातील आदिवासी समाजाच्या हक्क, विकास आणि सक्षमीकरणासाठी कार्यरत असलेले एक समन्वयक व्यासपीठ आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायांच्या जीवनमानात सकारात्मक आणि शाश्वत बदल घडवण्यासाठी हा उपक्रम उभा राहिला आहे. आदिवासी समाजाच्या परंपरा, संस्कृती आणि निसर्गाशी असलेले नाते यांचा आदर राखत, त्यांच्या शिक्षण, आरोग्य, उपजीविका आणि जमिनीवरील हक्कांच्या प्रश्नांवर धोरणात्मक पातळीवर काम करण्यासाठी हे केंद्र सातत्याने प्रयत्नशील आहे.
केंद्राच्या माध्यमातून वनहक्क (FRA) आणि पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामसभांचे सशक्तीकरण, प्रलंबित दाव्यांवरील पाठपुरावा, स्थानिक संस्थांशी समन्वय तसेच विविध भागांतील आदिवासी समस्यांचे दस्तऐवजीकरण या दिशेने केंद्र कार्यरत आहे. राज्यभरातील सामाजिक संस्था, कार्यकर्ते, अभ्यासक आणि प्रशासन यांना एकत्र आणून संवाद, प्रशिक्षण आणि सहकार्यातून आदिवासी समाजाचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचवणे हे केंद्राचे महत्त्वाचे कार्य आहे. आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्कांसह सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि संधीसमृद्ध भविष्य देणे, हे आदिवासी विकास केंद्राचे ध्येय आहे.
यशवंत इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, माहितीपट आणि चित्रपट स्क्रीनिंगच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्यही यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने नेहमीचं सुरू असतं. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन युवा पिढीपर्यंत महापुरुषांचे मौलिक विचार पोहोचावेत म्हणून ' परिवर्तनाचे शिल्पकार ' ही ऑडियो पॉडकास्ट सीरिज करण्यात आली.
गेली २५ वर्षे तंत्रज्ञान आणि माहिती क्षेत्रात यशवंतराव चव्हाण माहिती आणि तंत्रज्ञान प्रबोधनी सक्रिय आहे. तसेच तळागाळातील लोकांना कायदेविषयक मोफत सहाय्य आणि सवलत पुरवणारा फोरम १९९९ पासून सक्रिय आहे. यासोबतच चव्हाण सेंटरच्या मध्यवर्ती कार्यालयात विविध कार्यक्रमांसाठी प्रशस्त सभागृह, कॉन्फरन्स रूम व हॉल्स उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे व ग्राहकांना रास्त भावात उत्तम भाजीपाला मिळावा यासाठी दर शनिवारी चव्हाण सेंटर, मुंबई येथे शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी मोफत जागा उपलब्ध करून देण्यात येते. यास ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या कार्याचा आढावा घेणारं "यशवंत संवाद" हे मॅगझिन दर दोन महिन्यांनी ई वार्तापत्राच्या म्हणजेच डिजिटल स्वरूपात चव्हाण सेंटरच्या वेबसाईटवर प्रकाशित केलं जातं.




