महाराष्ट्र शासनाच्या ऐतिहासिक महिला धोरणाला ३२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने १७ सप्टेंबर रोजी पाचव्या ‘यशस्विनी सन्मान पुरस्कार’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये वैशाली घुगे (कृषी), सुनंदा भोसेकर (साहित्य), प्राची जागुष्टे-महाजन (उद्योजकता), मालती सगणे (सामाजिक कार्य), प्रगती बाणखेले (पत्रकारिता), सविता मराठे (क्रीडा प्रशिक्षण) आणि ॲड. परिक्रमा खोत (युवा यशस्विनी पुरस्कार) यांना सन्मानित करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्णय प्रक्रियेत महिलांच्या सक्रिय सहभागावर आणि महापुरुषांच्या पुरोगामी विचारांचा अंगीकार करत अंधश्रद्धेविरुद्ध विवेकाने वागण्यावर भर दिला. सत्काराला उत्तर देताना सर्व पुरस्कारार्थी महिलांनी कृतज्ञता व्यक्त करत आपापल्या क्षेत्रांतील सामाजिक बांधिलकी अधिक दृढ करण्याचा निर्धार केला. या सोहळ्यास माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, अरुण गुजराथी यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तर प्रास्ताविक दत्ता बाळसराफ यांनी केले.




