यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या आदेशाने ठाणे केंद्र श्री. मुरलीधर नाले यांच्या अध्यक्षतेखाली १ एप्रिल २०१६ रोजी स्थापन करण्यात आले. ११ व्यक्तींच्या या कार्यकारणीत चार्टड अकाऊंट, सर्जन, वकील, इंजिनिअर, कोमसापचे अध्यक्ष, साहित्य अकादमीचे अधिकारी, महाराष्ट्र शासनाच्या विक्रीकर विभागाचे उपायुक्त, महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे प्रमुख प्राध्यापक, एम. टी. एन.एल. चे निवृत्त व्यवस्थापक, नाटककार यांचा अंर्तभाव आहे. लवकरच दोन स्त्री सदस्यांच्या अंर्तभावासाठी प्रस्ताव पाठविण्यात येत आहे. ठाणे केंद्राचा उद्घाटनाचा दिमाखदार सोहळा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे सरचिटणीस श्री शरद काळे, आय. ए. एस. यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ४ जून २०१६ रोजी पार पडला. त्यावेळी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या 'कृष्ठकाठ' या आत्मचरित्रातील काही भागाचे अभिवाचन प्रा. नितीन आरेकर यांनी केले. माजी खासदार डॉ. संजय नाईक यांनी चव्हाण साहेळांच्या काही आठवणी सांगतांना साहेबांच्या गुणांचा गौरव केला. त्याप्रसंगी कवितांची मैफील देखील आयोजित करण्यात आली होती. स्थानिक कवींच्या जोडीला जेष्ठ कवयित्री अनुपमा उजगरे व डॉ. महेश केळुस्करांनी आपल्या कविता पेश करून समारंभाची रंगत द्विगुणित केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री. शरद काळे साहेबांनी चव्हाण साहेबांच्या मानवतावादी स्वभावाची ओळख करुन दिली.