यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील संयमी व खंबीर नेते होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना अनेकदा सत्यासाठी संघर्ष करावा लागला. बहुजनांसाठी कल्याणकारी योजना राबवताना अनेकदा विरोध पत्करावा लागला. परंतु वेळोवेळी त्यांनी संयम आणि खंबीरपणा टिकवून ठेवला असे मत डॉ. राजेंद्र दास यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई व श्री शिवाजी शिक्षण मंडळ बार्शीच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ३७ व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी. बाय. यादव होते. ते पुढे म्हणाले की, यशवंतरावानी शालेय शिक्षण घेत असतानाच स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली व प्रसंगी कारावासही भोगला. चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाला स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी होती. त्यामुळे स्वातंत्र्यानंतरच्या सबंध राजकीय जीवनात त्यांनी कधीही नैतिक विवेकाचा आवकाश संकुचित होऊ दिला नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू त्यांनी या निमित्ताने उलगडून दाखविले.

याप्रसंगी संस्थेचे सचिव पी. टी. पाटील, खजिनदार जयकुमार शितोळे, संस्थेचे माजी सचिव विष्णू पाटील, संस्थेचे विश्वस्त डॉ. चंद्रक्रांत मोरे व श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रो. डॉ. भारती रेवडकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे खजिनदार व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे सदस्य श्री जयकुमार शितोळे यांनी केले. याप्रसंगी त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या व संस्थेच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा, त्यांच्या साहित्याचा सर्वदूर प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच महिलांसाठी विशेष कार्यक्रम राबविणार असल्याचे सांगितले. पाहुण्यांचे स्वागत करताना संस्थेचे सचिव श्री पी.टी. पाटील यांनी यशवंतराव चव्हाण यांचे विचार सर्वांनी आत्मसात करावे असे सांगितले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. बी. वाय. यादव यांनी यशवंतराव चव्हाण आणि कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या एकमेकांशी असलेल्या वैचारिक ऋणानुबंधाची आठवण करून दिली. संस्थेच्या कार्यात चव्हाण साहेब यांनी नेहमी मदतीचा हात दिला होता. यशवंतरावांनी इबीसीची सवलत उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांना शिक्षण घेता आल्याचेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा व कार्यक्रमाच्या अध्यक्षांचा परिचय डॉ. रविकांत शिंदे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एम. एल. श्रीमंगल आणि प्रा. ए.स. गवळी यांनी केले, तर आभार माजी प्राचार्य डॉ. चंद्रकांत मोरे यांनी मानले. सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - सोलापूर