भूपृष्ठावरील पाण्याचे योग्य नियोजन वेळीच झाले नाही तर उद्या पश्चाताप करण्याशिवाय गत्यंतर नाही. पाण्याच्या प्रश्नावरील उपाययोजनेतूनच सुबत्ता येणार आहे. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटणे शाश्वत विकासासाठी गरजेचे आहे. त्यासाठी कृतीशिलता वाढविण्याची गरज आहे, असा सूर जल जन जागर प्रकल्प भूजल अभ्यास कार्यशाळेत उमटला.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, सोलापूर विभागीय केंद्र व मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आणि सोलापूर आकाशवाणी केंद्राच्यावतीने रविवार २१ मे रोजी कार्यशाळा पार पडली. उद्घाटनप्रसंगी आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गो. मा. पवार, मंगळवेढेकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. श्रीकांत येळेगावकर, राजशेखर शिवदारे, ज्येष्ठ शूगर्भशास्त्रज्ञ श्रीनिवास वडगबाळकर, प्राचार्य चिंचखेडे, कार्यशाळेचे प्रकल्प समन्वयक रजनीश जोशी यांची प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्घाटनपर समारंभादरम्यान बोलताना आकाशवाणीचे सहायक संचालक सुनील शिनखेडे म्हणाले, पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन आता कमी पाण्यातील पिके घेण्याची गरज आहे. सोलापुरातील ऊस कारखान्यांच्या आकडेवारीवर दृष्टिक्षेप टाकून ते म्हणाले, उसासाठी लागणा-या अतिरिक्त पाण्याचे नियोजन होण्याची गरज आहे. कमी पाण्यात अधिक पिके कशी घेता येतील याकडे त्यांनी लक्ष वेधले. डॉ. गो.मा.पवार म्हणाले, या कार्यशाळेचे पाण्यासारख्या महत्त्वाच्या विषयाचे मोल पटवून दिले आहे. त्यामुळे ही कार्यशाळा दिशादर्शक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यशाळेचे प्रकल्प समन्वयक रजनीश जोशी यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेमागील भूमिका मांडली. उपलब्ध पाणी, सांडपाणी, पाण्याचे स्त्रोत याचा सांगोपांग अभ्यास करुन पुढच्या काळासाठी भूजलाचा समग्र अभ्यास यातून करता यावा, हा यामागील हेतू असल्याचे ते म्हणाले.
'सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय भूगर्भरचना आणि जलधारणा क्षमता'या विषयावर बोलताना ज्येष्ठ भूगर्भशास्त्रज्ञ श्रीनिवास वडगबाळकर म्हणाले, पाणी हा मौल्यवान साठा आहे. त्याचे नियोजन योग्यपणे होण्याची गरज आहे. अलीकडे एकत्रिकरण आणि नागरीकरणातून पाणी समस्या वाढली आहे. यातूनच सांडपाण्याची वाढ झाली असून या पाण्याचे शुद्धीकरण करुन त्याचा योग्य उपयोग करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्रात ३०० फुटापर्यंत पाणी मिळू शकते. मल्टी लेअर सिस्टीममुळे पाण्याची पातळी कमी-अधिक असते. सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा विचार करता माण, सीना, भोगावती, भीमा या मुख्य नद्या आहेत. या नद्यांच्या खो-यामुळे निर्माण झालेला भूप्रदेश, जिल्ह्यातील भूस्तर, खडकांची रचना, सरासरी पर्जन्यमान आणि होणारा पाण्याचा निचरा या तांत्रिक बाबीवरही त्यांनी प्रकाश टाकला.
या कार्यशाळेचे संचालन दिनेश शिंदे यांनी केले. आभार यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंगळवेढा विभागीय केंद्राचे विश्वस्त राहुल शहा यांनी मानले.