सोलापूर विभाग : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईच्या विभागीय केंद्राचा शुभारंभ रविवारी सायंकाळी वा. का. किर्लोस्कर सभागृहात पार पडला. यावेळी 'आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाणांचे योगदान' या विषयावर पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यस्थानी ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव प्रतिष्ठान सोलापूर केंद्राचे अध्यक्ष गो. मा. पवार होते. व्यासपीठावर माजी आमदार युन्नूसभाई शेख, माजी खासदार धर्मण्णा सादूल, आमदार दिलीप सोपल, राजशेखर शिवदारे, राहुल शहा, विचारवंत दत्ता गायकवाड, प्रतिष्ठानचे सचिव दिनेश शिंदे उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन आणि यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सचिव दिनेश शिंदे यांनी प्रास्ताविक केले. राज्यात प्रतिष्ठानची १० कार्यालये असून, सोलापूरचा ११ व्या केंद्राचा शुभारंभ होत असल्याचे स्पष्ट केले.
प्रतिष्ठानचे सदस्य, आमदार दिलीप सोपल यांनी यशवंतरावांच्या आठवणींना उजाळा दिला. आजच्या गतिमान काळात कोणाला थांबायला वेळ नाही.. डायरेक्ट वरच्या पदापर्यंत पोहोचण्याची घाई झाली आहे. तळागाळातील सामान्यांचे काम करुन आलेल्या अनुभवावर जनतेचे प्रश्न मांडता येतात, हे हल्लीची पिढी विसरत चालल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.
उल्हास पवार यांनी आपल्या व्याख्यानातून यशवंतरावांच्या विविध पैंलूंवर प्रकाश टाकला. जातीनिरपेक्षता मांडणारे प्रभावी नेते, उत्त संसदपटू होते. जनसंपर्क कसा असावा याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. सामान्य कार्यकर्त्यांची उंची कशी वाढवावी याची उत्तम जाण त्यांच्याकडे होती. वसंतराव नाईक यांच्यासारख्या दूददृष्टी नेता ११ वर्षे राज्याचा मुख्यमंत्री राहिला हे यशवंतरावांनी त्यांच्यातील हेरलेल्या कार्तकर्तृत्वामुळेच. आजचा काळातही आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये यशवंतरावांचे योगदान मोलाचे असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. गो. मा. पवार यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाला. त्यांनी यशवंतरावांच्या विविध पैलूंची उदाहरणे दिली.