यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, विभागीय केंद्र नवी मुंबई, मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, स्त्री मुक्ती संघटना, वी नीड यू सोसायटी, अन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाटकघर, पुणे निर्मित, रामू रामनाथन लिखित, अतुल पेठे दिगदर्शित ‘ शब्दांची रोजनिशी ’ हा नाट्याविष्कार वाशी येथे केतकी थत्ते, अतुल पेठे यांनी सादर केला. नाट्य रसिकांनी दिलेल्या अप्रतिम प्रतिसादामुळे सभागृह गच्च भरले होते. जगातूनच अस्सल भाषेचा ऱ्हास होत आहे. मराठी भाषेबद्दल तर हे अधिकच अधोरेखित होतं. विविध भाषा, त्यावर होणाऱ्या अन्य भाषेंची अतिक्रमणे व ह्यातून मूळ भाषेतील शब्दांचे लुप्त होणे व एकूणच भाषेचा ऱ्हास होत जाणे, ह्यावर मार्मिक भाष्य करणारं प्रायोगिक व दुर्बोधतेतुन सरलतेकडे नेणारा अतुल पेठे व केतकी थत्ते ह्यांच्या थक्क करणाऱ्या अभिनयाने नटलेला नाट्याविष्कार म्हणजे ‘ शब्दांची रोजनिशी ’ हे नाटक. दिड तासाचा हा प्रयोग नवी मुंबई केंद्राच्या सह प्रायोजकत्वातून वाशीच्या साहित्य मंदिर वातानुकूलित सभागृहात पार पडला, तेव्हा पूर्ण वेळ निशब्द शांतता पसरली होती, रसिक प्रयोग पाहण्यात गुंतून गेले होते. अध्यक्ष प्रमोद कर्नाड यांच्या प्रयत्नाने नवी मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, नवी मुंबई विभागीय केंद्राच्या माध्यमातून असे सुरेख सांस्कृतिक कार्यक्रम रसिकांना पहायला मिळत आहेत.