नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार 19 मे 2018 रोजी सायंकाळी 6.30 वाजता सुप्रसिद्ध मेक्सीकन सिनेदिग्दर्शक अलेकझांडर इनारीतु यांचा ‘अमोरस पॅरॉस’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक-422013 येथे दाखविण्यात येणार आहे.
इथेही बॅबेल चित्रपटासारखीच मांडणी आहे. चित्रपटाचे कथानक मेक्सीको सिटी ह्या महानगरात घडते. तीन स्वतंत्र कथानकांचे धागे एका अपघाताने जोडलेले असतात. चित्रपटात माणसाचा सहचर असलेला कुत्रा अत्यंत खुबीने प्रतिकात्मकरीत्या वापरला आहे. कुत्र्यांच्या झुंजीच्या खेळाची काही चित्तथरारक दृष्ये चित्रपटात आहेत. काहीसा गुंतागुंतीचा पण खिळवून टाकणारा हा चित्रपट इनारीतुच्या चित्रपट कारकीर्दीतील मानाचा तुराच आहे. जगभर 54 विविध पारीतोषिकांनी गौरविलेला हा चित्रपट मानवी जीवन, त्यातील संघर्ष तसेच कुत्र्यासारखे मरण ह्यावर भेदक भाष्य करतो. मेक्सीको येथे 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अमोरस पॅरॉस’ या सिनेमाचा कालावधी 153 मिनीटांचा आहे.
‘अमोरस पॅरॉस’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.