दिनांक २७ जुलै २०२३ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या पदाधिकारी मंडळाची शरद पवार एज्युकेशन फेलोशिप प्राप्त प्रकल्पास भेट झाली. मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संचलित अनुदानित आश्रमशाळा मोहपाडा येथील उपशिक्षक श्री.नामदेव वाजे यांच्या Learning Beyond : शाळा पुस्तकापलीकडील जीवन शिक्षण या प्रकल्पाला शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करीता यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने "शरद पवार इन्सपायर फेलोशिप इन एज्युकेशन" जाहीर झालेली आहे. सदर उपक्रमाच्या प्रकल्प भेटीसाठी आज चव्हाण सेंटरच्या सी.ई.ओ. श्रीमती दीप्ती नाखले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. तसेच चव्हाण सेंटरचे पदाधिकारी मा.दत्ता बाळसराफ( मानद कार्यक्रम व्यवस्थापक), मा.योगेश कुदळे(एज्युकेशन व्हर्टिकल हेड) आणि समन्वयक मा. भूषण काळे उपस्थित होते.

सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पारंपरिक आदिवासी वाद्य पावरी वादनाने करण्यात आले. प्रकल्प प्रमुख श्री. नामदेव वाजे यांनी पुस्तकापलीकडील जीवनशिक्षण प्रकल्पाची माहिती व सद्यस्थिती पीपीटीच्या माध्यमातून प्रमुख अतिथींना स्पष्ट करून दिली आणि पदाधिकारी मंडळाचा परिचय करून दिला. शाळेतील सर्वच शिक्षकांनी आपला परिचय व कार्याची माहिती चव्हाण सेंटरच्या पदाधिकारी मंडळाला करून दिली. मा.दत्ता बाळसराफ यांनी चव्हाण सेंटरचे कार्य व एज्युकेशन फेलोशिपची उद्दिष्टे विद्यार्थी व शिक्षकांना मुलाखतीच्या स्वरूपात दिली.

श्रीमती दीप्ती नाखले यांनी शाळेत राबविल्या गेलेल्या उपक्रमांचे कौतुक केले. शाळेतील क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरव केला. पुढील वाटचालीस सर्वांना शुभेच्छा दिल्या.

मोहपाडा आश्रमशाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.सतीश शेळके यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत सादर केला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. दीपक कणसेपाटील यांनी चव्हाण सेंटरच्या पदाधिकारी मंडळाचे आभार व्यक्त करत, यापुढेही चव्हाण सेंटरच्या वतीने विविध योजना शाळेत राबविण्याची विनंती केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थीनी कु.भाग्यश्री गायकवाड हिने केले. दर्शना कामडी हिने "म्युझियम आपल्या दारी" या उपक्रमाबद्दल मनोगत व्यक्त केले. उपस्थित सर्व अतिथींचे आभार उपशिक्षक श्री.दीपक अहिरे यांनी मानले.

सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक श्री.संतोष गौळी यांच्या मार्गदर्शखाली निलेश बुवा, सुनील कासार, जितेंद्र ठोके, कैलास चौधरी, मुकेश दोंदे, बाळनाथ शेळके, जयवंती जाधव, मीना पवार, रवी नेहरे, कैलास गांगोडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

क्षेत्र : 
द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक
दिनांक : 
27 जुलै 2023