नाशिक (दि. ९) : आजच्या धावपळीच्या युगात महिलांनी आरोग्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे असून मनाची व शरीराची काळजी घेणे म्हणजेच जीवनाचा आनंद घेण्यासाठी सक्षम होणे होय. त्यासाठी जीवनसत्वयुक्त आहार , व्यायाम व सकारात्मक जीवनशैलीचा स्वीकार करावा. असे प्रतिपादन सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्पना सुधीर संकलेचा यांनी केले. विश्वास को-ऑप.बँक लि. नाशिक , यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई , विभागीय केंद्र नाशिक , सारस्वत बँक , विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट , नाशिक , व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त ‘ महिला व आरोग्य ’ या विषयांवर डॉ. सौ. कल्पना संकलेचा यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. सदर कार्यक्रम विश्वास हब येथे संपन्न झाला. डॉ. सौ. संकलेचा यांनी यावेळी अ‍ॅनेमिया , फायब्रॉइड , विविध कॅन्सर या आजारांची लक्षणे व वेळीच घ्यायची काळजी तसेच रक्तदाब , हिमोग्लोबिन , बोन डेन्सीटी या तपासण्यांची गरज सांगितली व उपस्थित महिलांच्या प्रश्‍नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक करतांना विश्वास ठाकूर म्हणाले की , कुटुंबाला घरपण देणारी महिला , अनेक आघाड्यांवर मेहनतीने , निरपेक्षपणे लढत असते. तिचे आरोग्य उत्तम तरच कुटुंबाचे आरोग्य उत्तम असते. म्हणूनच महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. यावेळी कोरोना व्हायरस विषयी जनप्रबोधनपर माहिती व उपायांविषयी माहिती देण्यात आली. बँकेच्या कर्मचारी , अधिकार्‍यांना हँड सॅनिटायझर , ग्लोजचे वाटप करण्यात आले. डॉ. कल्पना संकलेचा यांचे स्वागत वैशाली जामदार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बँकेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सारिका देशपांडे , प्रियंका ठाकूर आदिंनी परिश्रम घेतले.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक