नाशिक : आजच्या कोविड-19 च्या काळात अख्खा समाज, जग ढवळून निघाले आहे. कोविडसह जगतांना प्रत्येकाच्या मनावर एक असह्य ताण दाटून आलेला आहे. कौटुंबिक पातळीवर वाढलेला ताण-तणाव आणि सर्व सदस्य घरातच असल्याने महिलांसाठी वाढलेली कामे त्यातून तिला अनेक मानसिक, शारिरीक व्यथा, समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या सामाजिक प्रश्नाचा सर्वंकष वेध घेण्याच्या दृष्टीने एका विशेष ‘फेसबुक वेबिनारचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या महिलांच्या शारिरीक, मानसिक व्यथा, समस्या’ या विषयांवर वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. मा. सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार, 30 जून 2021 रोजी दुपारी 3.00 वाजता फेसबुकद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर वेबिनार Facebook page@ycpnashik या पेजवर सर्वांसाठी खूला आहे. मा.सुप्रियाताई यांनी महिला सक्षमीकरण व त्यांच्या हक्कांसाठी व्यापक लढा उभारला आहे. समाजातील तळागाळातील महिलांच्या मुलभूत प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्याच जाणिवेतून हा परिसंवाद दिशादर्शक ठरावा. सदर परिसंवादात यशस्विनी सामाजिक अभियानच्या मुख्य समन्वयक अॅड. उषाताई दराडे, यशस्विनी सामाजिक अभियानच्या मुख्य निरिक्षक सुरेखाताई ठाकरे, यशस्विनी सामाजिक अभियानचे संचालक विश्वास ठाकूर, कार्यकारी संपादक, देशदूत व देशदूत टाईम्स तसेच समुपदेशक डॉ. वैशाली बालाजीवाले, सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत संकलेचा, सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. मृणाल भारद्वाज, विशेष प्रतिनिधी दैनिक दिव्य मराठी, दिप्ती राऊत, लेखिका अपर्णा क्षेमकल्याणी आदि मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. यशस्विनी सामाजिक अभियान, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. तरी या वेबिनारचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घेण्याचे आवाहन यशस्विनी सामाजिक अभियानचे संचालक विश्वास ठाकूर यांनी केले आहे.