नाशिक (दि. २२) : स्वरांचा अलवार आणि तितकाच सहज नाद, वातावरणातील आल्हाददायकता, सूर व शब्दातील नाते अलगद उलगडले जात होते. गीतांतून जगण्यासाठी लागणारी ऊर्जा निनादत होती. त्यात जवळच्या नात्याला दिलेली हाक आणि ईश्वरभक्तीही होती. ‘ सूर विश्वास ’ च्या मैफीलीचे १३ वे पुष्प मधुरा बेळे यांनी गुंफले आणि स्वरांच्या एका वेगळ्या दुनियेची सफर घडवली. मैफीलीची सुरूवात भैरव रागाने झाली. शब्द होते ‘ बालमवा मोरे सैय्या ’ मनातील आर्तता आणि प्रेमाच्या व्यापक विचारांचे दर्शन समर्पण भावनेतून समोर आले. गायनातील सहजता व आर्त स्वरांनी मैफीलीला रंग चढला. त्यानंतर कुकुभ बिलावल-राग सादर केला. झपताल-घनघुमार होता. जाणिवांनी आतल्या उर्मीला दिलेली साद आनंदस्वरांची पर्वणीच होती. मैफीलीचा समारोप संत ज्ञानेश्वरांच्या अभंगाने केली. ‘ पडिले दुर देशी, मज आठवे मानसी ’ यातून आत्मानुभूती आणि ईश्वर भक्ती यांचा अनोखा संगम व्यक्त झाला. ही नव्या उन्मेषाने जगण्याची प्रार्थनाच होती. रसिक कुलकर्णी (तबला), संस्कार जानोरकर (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. ‘ विश्वास ग्रृप ’ चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे. सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वास गार्डन, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला. उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सूरविश्वास मैफिलीत करण्यात येतो. त्यात नागपूर येथे पार पडलेल्या राष्ट्रीय टायगरमॅन ह्या ट्रायथलॉन स्पर्धेत वयाच्या ६४ व्या वर्षी प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल डॉ. सुभाष पवार यांचा सन्मान विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इस्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केला. मधूरा बेळे यांचा सन्मान डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर यांनी केला. रसिक कुलकर्णी यांचा सन्मान ओझर मर्चंट बँकेचे संचालक रत्नाकर कदम तर संस्कार जानोरकर यांचा सन्मान राहूल फाटे यांनी केला. स्वराली जोगळेकर यांचा सन्मान माधवबागच्या आरोग्य समन्वयक मार्केटींग हेड मधुरा गुर्जर-वाणी यांनी केला. पंडित अविराज तायडे यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांनी केला. कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना पंडित अविराज तायडे म्हणाले की, सूरविश्वास म्हणजे स्वरांचा यज्ञ असून त्या माध्यमातून अनेक प्रतिभावंत कलावंतांना त्यांच्या प्रतिभेला व्यासपीठ मिळत आहे. त्यासाठी सर्वांनी कानसेन म्हणून आपले योगदान द्यावे.