
नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शनिवार १७ मार्च २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध अमेरीकन दिग्दर्शक डेव्हीड लींच यांचा ‘द एलिफंट मॅन’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वासलॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक- ४२२०१३ येथे दाखविण्यात येणार आहे.
दिग्दर्शक डेव्हीड लिंच सत्यघटनेवर आधारीत चित्रपटात मानवी देहाचा सोहळाच साजरा करतो. देह, मन, बुद्धी आणि लोकमनातील दृढ संकल्पनांना छेद देत तो एका विद्रुप शरीराच्या माणसाची गोष्ट सांगतो. ह्या ‘एलिफंट मॅन’ ची गाठ एकोणाविसाव्या शतकातील व्हिक्टोरीयन इंग्लडमधील एका डॉक्टरशी पडते. सौंदर्य, विद्रुपता, प्रेम, सहवेदना, तिरस्कार अशा संमिश्र भावनांचा पटच ह्या चित्रपटात उलगडतो.
डेव्हीड लींच खरंतर प्रथम चित्रकार व नंतर चित्रपट दिग्दर्शक त्याच्या चित्रपटातील विलक्षण चित्र व्यवस्था मानवी शरीराचे एक वेगळेच ‘दर्शन’ गूढ, अतिवास्तव वातावरण निर्मिती, अस्वस्थता आणि मानवी व्यवहारांचा अजब खेळ एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. ‘द एलिफंट मॅन’ १९८० मध्ये अमेरीका येथे प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १२४ मिनीटांचा आहे.
‘द एलिफंट मॅन’ हा चित्रपट बघण्यास जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष विनायक पाटील, कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, राजवर्धन कदमबांडे, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे व विक्रम मोरे यांनी केले आहे.