सूर विश्वास रजिंदर कौर यांच्या स्वरांतून निथळली ईश्वरभक्तीची आस नाशिक (प्रतिनिधी) : सकाळच्या प्रसन्न थंडीत सुरांची अलवार भेट सर्वांना सुखावून गेली आणि स्वरमाधुर्य आणि अस्सल सुरांची भेट रसिकांना आनंद देऊन गेली. स्वर आणि शब्दांतील नाद यांची जाणीव शास्त्रीय संगीतातील प्रयोगांची नवी ओळख करून देणारा होता. विश्वास गृ्रपतर्फे ‘सूरविश्वास’चे बारावे पुष्प रजिंदर कौर यांच्या स्वरांनी गुंफले. नटभैरव रागाने त्यांनी मैफिलीची सुरूवात केली. शब्द होते ‘लालन तुमसे भली न हो’ एक अनाहत नाद आणि शब्दा-शब्दांतून निथळणारा आशय यातून मैफल रंगत गेली. त्यानंतर ‘दादरा’ सादर केला. ‘सैय्या मोरे तोरी बाकी नजरीया’ यातून आर्तता आणि प्रेमाचा, आपुलकीचा स्रोत स्वरांतून ओसंडत होता. यानंतर पंजाबी भावभक्तीचा स्वर शबद मधून सादर केला. भक्ती आणि जीवन जगण्यातला आनंद यातून निनादत होता. ‘सून यार हमारे सजन’ ही विनवणी होती. भैरवी ने कार्यक्रमाची सांगता झाली. ‘आयी शरण निहारी’तून परमेश्वर भक्तीची आस व्यक्त केली. सुजीत काळे (तबला), कृपा परदेशी (संवादिनी) यांनी साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. स्मिता मालपुरे यांनी केले. ‘विश्वास ग्रृप’चे कुटुंबप्रमुख विश्वास ठाकूर हे या उपक्रमाचे आयोजक असून, संकल्पना विनायक रानडे यांची आहे. सदर कार्यक्रम विश्वास गार्डन, विश्वास को-ऑप. बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे संपन्न झाला. उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सूरविश्वास मैफिलीत करण्यात येतो. त्यात महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे रा.शं. दातार नाट्यगौरव पुरस्काराबद्दल दत्ता पाटील यांना रमेश देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कलावंतांचे सन्मान रागीणी कामतीकर, डॉ.मनोज शिंपी, अमर भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. आभार प्रदर्शन विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी यांनी केले. सदर कार्यक्रम यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ, विश्वास गार्डन, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.