‘है तेरे साथ मेरी वफा’ मैफलीचे आयोजन
नाशिक : भारतीय चित्रपट संगीतात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संगीताने रसिकांना अवीट व मधुर गाणी देणारे संगीतकार मदन मोहन यांचे स्मरण म्हणून रसिकांसाठी ‘है तेरे साथ मेरी वफा’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर मैफील शनिवार दि.१९ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ६ वाजता विश्वास लॉन्स येथे संपन्न होणार आहे. सुप्रसिद्ध गायिका रागिणी कामतीकर, मिलींद धटींगण व विवेक केळकर ही गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे खुमासदार निवेदन सुप्रसिद्ध लेखक व संगीत अभ्यासक अंबरीश मिश्र करणार आहेत. मदन मोहन यांनी संगीत दिलेल्या गाण्यांच्या आठवणी वाद्यरचनेचा अभिनव वापर याविषयी अंबरीश मिश्र अभ्यासपूर्ण आणि सहज निवेदनात उलगडून सांगणार आहेत. अंबरीशजींच्या संगीत व्यासंगाची अनोखी भेट रसिकांना आनंद अनुभती देणारी ठरणार आहे.
मैफीलीला साथसंगत अॅबड. प्रमोद पवार (हार्मोनियम), प्रशांत महाले (कीबोर्ड), रागेश्री धुमाळ (कीबोर्ड), निलेश सोनवणे (गिटार), आदित्य कुलकर्णी (तबला), स्वरांजय धुमाळ (ढोलक), अभिजीत शर्मा (ऑक्टोपॅड) हे करणार आहेत. ध्वनीव्यवस्था तुषार बागुल यांची आहे. मैफीलीची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप. बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक, संकलेचा कन्स्ट्रक्शन, नाशिक, जुम्मा मशिद चॅरीटेबल ट्रस्ट, विश्वास लॉन्स व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मैफील संपन्न होणार आहे. मैफल सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.
फिल्मी दुनियेत मदन मोहन यांची सुरूवात गायक म्हणून झाली. १९४८ साली ‘शाहीन’ चित्रपटात लता मंगेशकर यांच्या बरोबर त्यांनी दोन युगल गीते गायली. त्यानंतर संगीतकार एस.डी. बर्मन, श्यामसुंदर यांचे सहाय्यक झाले.
१९५० मध्ये ‘ऑखे’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. २००४ मधील वीरझारा हा त्यांचा शेवटचा चित्रपट अशी चोपन्न वर्ष आपल्या मधुर संगीताने रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. अजूनही त्यांच्या संगीताची मोहिनी टिकून आहे. मदन मोहन यांनी एकूण ९३ चित्रपटांना संगीत दिले असून संगीतबद्ध केलेल्या गीतांची संख्या ६६३ आहे. लता मंगेशकर, मिना कपूर, आशा भोसले, शमशाद बेगम, मोहम्मद रफी, किशोर कुमार, तलत मेहमूद, मुकेश, गीतादत्त, सुरैय्या, भूपिंदर सिंग, उदित नारायण, अमित कुमार, महेंद्र कपूर, मन्ना डे, मुबारक बेगम, उषा खन्ना, सुमन कल्याणपूर, कमल बारोट, मेहंदी हसन अशा नामांकित गायक, गायिकांनी त्यांच्याकडे गायन केले.
कौन आया मेरे मन के द्वारे, यु हसरतों के दाग, जिया ले गयो जो मोरा, तेरी आँखो के सिवा, भूली दास्ता, नैनो में बदरा छाये अशी मदन मोहन यांची अवीट गाणी रसिकांच्या ओठावर अजूनही रेंगाळत आहेत.
तरी या मैफीलीस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ. कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ. सुधीर संकलेचा, सदस्य कविता कर्डक, रऊफ पटेल, अॅ्ड नितीन ठाकरे, विश्वास को-ऑप बँकेचे उपाध्यक्ष विलास हावरे, मानद कार्यकारी संचालक मंगेश पंचाक्षरी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅकण्ड रिसर्च इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. मनोज शिंपी, सचिव विनायक रानडे, रेडिओ विश्वासचे समन्वयक डॉ. कैलास कमोद यांनी केले आहे.