नर्मदा परिक्रमा म्हणजे आत्मशोधाचा प्रवास असून जीवन जाणीवांना बळकटी देणारा नव्या जगण्याचा शोध घेणारा आहे. एकाच जीवनातून नव्या जीवनाची प्रत्यय देणारी ही यात्रा आतल्या अनेक शक्यतांना विस्तारणारी आहे. राग, लोभ, अहंकार, भौतिक सुख, याच्या पलीकडे खरा माणूस शोधण्याची ही खडतर प्रयोग शाळा आहे. असे प्रतिपादन विशाल मित्रा यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक, मेक वल्ड बेटर, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, ग्रंथ तुमच्या दारी, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८, कम्युनिटी रेडिओ व विश्वास गार्डन यांच्या संयुक्त विद्यमाने नर्मदा परिक्रमा पूर्ण करणारे विशाल मित्रा यांची मुलाखत क्लब हाऊस, ठाकूर रेसिडेन्सी, सावरकरनगर येथे आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते. मित्रा यांची मुलाखत डॉ. सुनिता वावरे यांनी घेतली.
श्री. मित्रा म्हणाले की, प्रतिकुल परिस्थितीत जीवन जगण्याची कला नर्मदा परिक्रमेचा प्रवास आपल्याला शिकवते. नव्या संस्कृतीचा हा प्रवास आहे. आयुष्य बदलवून टाकणारा हा अनुभव आहे. सुखाचा शोध, आसक्ती, मोह, माया, क्रोध यांवर विजय मिळवण्याचा यातून मार्ग सापडतो. असेही श्री. मित्रा म्हणाले. तीन हजार नऊशे साठ किलो मीटर, एकशे साठ दिवसांच्या नव्या जगाची ही सफर अचंबित करणारी होती. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मेक वर्ल्ड बेटरच्या मंजू बेळे-राठी यांनी केले.
यावेळी मंजु बेळे-राठी यांनीही नर्मदा परिक्रमेचे अनुभव कथन केले. मित्रा यांचे स्वागत अशोका ग्रुपचे अध्यक्ष अशोक कटारीया यांनी केले.