नाशिक : मनाला चैतन्यमय ठेवण्यासाठी व शारीरिक स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी ‘योगसाधना’ हा जीवन शैलीचा भाग बनवण्यासाठी प्रत्येकाने पुढे यावे. आजच्या धावपळीच्या व ताणतणावाच्या आयुष्यात योग जीवनात आनंद निर्माण करतो व मानसिक ऊर्जा प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडतो. असे प्रतिपादन योग योगप्रशिक्षक, रेवती नरवाडे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, निसर्गोपचार केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योग दिनानिमित्त सामुहिक योगाचे आयोजन करण्यात आले होते. सदर उपक्रम डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर अॅण्ड ट्रेनिंग हब, सावरकरनगर येथे संपन्न झाला. सदर उपक्रमाची संकल्पना विश्वास जयदेव ठाकूर यांची होती.
रेवती नरवाडे म्हणाल्या की, विचारांना, मेंदूला कायमच सजग ठेवण्यासाठी योग महत्त्वाचा आहे. त्यातून मन प्रफुल्लीत राहते व सकारात्मक विचार निर्माण होण्यास मदत होते. ओमकाराची साधना आणि प्राणायामातून शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते आणि त्यातून मनोबल वाढते. निरामय व निरोगी जीवनाचा योगा हा प्रभावी मंत्र आहे. योगसाधना ही शारीरिक, मानसिक स्थैर्य देणारी शक्ती आहे. प्राणायामातून श्वासावर नियंत्रण तर होतेच त्याचबरोबर एकाग्रता, चिंतनाची शक्ती विकसित होते. यावेळी त्यांनी विविध आसने उपस्थितांकडून करून घेतले आणि आसनांची अभ्यासपूर्ण माहिती दिली.
या सामुहिक योग साधनेसाठी मोठ्या प्रमाणावर साधक उपस्थित होते.