नाशिक : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक व विश्वास को-ऑप.बँक लि.,नाशिक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, सारस्वत बँक व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘चित्रपट चावडी’ उपक्रमांतर्गत शुक्रवार ७ एप्रिल २०१७ रोजी सायंकाळी ६.३० वाजता सुप्रसिद्ध ग्रीस दिग्दर्शक थिओ अॅन्जेलोपुओलॉस यांचा ‘लॅण्डस्केप इन द मिस्ट’ हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. सदर चित्रपट डिझास्टर मॅनेजमेंट अॅण्ड ट्रेनिंग हब (विश्वास लॉन्स), ठाकूर रेसिडेन्सी, विश्वास को-ऑप.बँकेसमोर, सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक येथे दाखविण्यात येणार आहे.
दोन लहान मुले आपल्या जर्मनीत असलेल्या वडीलांच्या शोधात निघतात. खरंतर त्यांच्या मनातील अज्ञात व काल्पनिक भासांचा हा प्रवास आहे. रेल्वे, मोटारीने ते दोघे हा प्रवास करतात. जग म्हणजे काय असते? याचाच हा शोध आहे. ज्या व्यक्तींना समाजात अस्तित्त्व नाही, स्थान नाही. धुक्यात हरवलेल्या शोधाची ही कहाणी आहे. हा प्रवास पूर्ण होतो का? वडीलांचा शोध लागला का? या उत्तरासाठी हा सिनेमा बघायलाच हवा. सन १९८८ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाचा कालावधी १२७ मिनिटांचा आहे.
‘लॅण्डस्केप इन द मिस्ट’ हा चित्रपट बघण्यास नाशिककर रसिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.मनोज शिंपी, कोषाध्यक्ष विनायक रानडे, सदस्य डॉ.कैलास कमोद, राजवर्धन कदमबांडे, सौ.कविता कर्डक, गुरमित बग्गा, रऊफ पटेल, अॅड. नितीन ठाकरे, डॉ. सुधीर संकलेचा व विक्रम मोरे यांनी केले आहे.