आज समाजात सर्वसामान्यांच्या जगण्यावर कॉर्पोरेट क्षेत्राचे वेगाने आक्रमण केले असून त्यांच्या हितासाठी राबविण्यात येणार्‍या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही. ‘पब्लिक सेक्टर’ ह्या संकल्पनेचा नव्या जाणिवेतून अर्थ शोधण्याची आता वेळ आली आहे. कष्टकरी व शेतमजूर यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासाठी निश्‍चित धोरण आखण्याची या काळात गरज आहे. त्यातून विकासाचे नवे स्वप्न उदयास येईल. लोकशाहीला ते बळकटी आणणारेच ठरेल असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केले. महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०५ व्या जयंतीच्या पुर्वसंध्येला ज्येष्ठ पत्रकार, हेमंत देसाई यांच्या लोकशाही की कॉर्पोरेटशाही? या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले की, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्याचे प्रश्‍न सोडविण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. राबविण्यात येणार्‍या योजनांची उपयुक्तता नेमक्या त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते का? हा विचार करण्याची गरज आहे. आजच्या बदललेल्या सामाजिक राजकीय, सांस्कृतिक पर्यावरणातील नकारात्मक गोष्टी काढून टाकल्या पाहिजेत. सोशल मिडीयाचा वापर सकारात्मकतेने केला पाहिजे व त्यातून जगण्याला पूरक अशा गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे व आपले नेमके मत तयार केले पाहिजे. ते लोकशाहीला बळ देणारे हवे. कार्पोरेट क्षेत्राचा स्वीकार परंपरा तुटू देण्यासाठी न करता जगणे सुसह्य करण्यासाठी करावा. समाज, संस्कृती, सत्व जोपासणे व माध्यमांची विश्वासार्हता या गोष्टी लोकशाहीच्या विकासाला दिशादर्शकच आहेत, असेही हेमंत देसाई म्हणाले. यावेळी त्यांनी शासन, उद्योगक्षेत्र, गुंतवणूक, जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचे स्थान, सोशल मिडीया, सोशल इंजिनिअरींग अशा अनेक मुद्यांचा परामर्श घेतला.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, विभागीय केंद्र नाशिक,विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी केले. हेमंत देसाई यांचा परिचय प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा यांनी केला. तर सन्मान बी.एस.एन.एल. चे महाप्रबंधक नितीन महाजन यांनी केला. कार्यक्रमास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक पाटील, सदस्य अ‍ॅड. नितीन ठाकरे तसेच पां.भां. करंजकर, डॉ. प्रदिप पवार, प्राचार्य प्रशांत पाटील, प्रविण मानकर, जलतज्ज्ञ राजेंद्र जाधव, प्रेमनाथ सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते.

द्वारे कार्यक्रम : 
जिल्हा केंद्र - नाशिक