नाशिक : मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी बालनाट्य शिबिर हे प्रभावी माध्यम आहे. त्यांच्यातील अविष्काराला हक्काचे व्यासपीठ यामुळे निर्माण झाले आहे. याच जाणिवेतून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप. बँक लि. नाशिक, सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध नाट्यकलावंत लक्ष्मी पिंपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार २ मे ते मंगळवार ९ मे २०१७ या कालावधीत बालनाट्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
लक्ष्मी पिंपळे यांनी अभिनय म्हणजे काय? आणि भूमिकेतून साकारणारे जिवंत नाट्य यांविषयी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. नवरसांचा नाट्यमयता निर्माण करण्यासाठी कसा वापर करता येतो यांविषयी त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. अभिनय करतांना देहबोली, आवाजातील चढउतार यांवर लक्ष केंद्रीत कसे करावे याबाबतही विविध प्रवेशातून मार्गदर्शन केले. अभिनय ही कला असून त्यातून मिळणारा आनंद नवे शिकविणारा असतो. प्रत्येकात कलावंत दडलेला असतो आणि त्याचा शोध घेण्याचे काम अशी शिबीरे करतात यावेळी लक्ष्मी पिंपळे यांनी ओमकार नाट्य शिबिरातून कसे व्यक्त व्हावे यांचे साभिनय प्रात्यक्षिक करून घेतले. त्यास शिबिरार्थींनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.
शिबिराचा समारोप प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष विश्वास ठाकूर व सौ. ज्योती विश्वास ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला व शिबीरार्थींना प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. याप्रसंगी मुलांनी सादरीकरणातून अभिनयाची चूणूक दाखवली. यात दिवाकरांच्या नाट्यछटा, गाढवाचं लग्न, प्राण्यांचं अद्भूत जग आणि त्यांची जगण्याची शैली, ‘ती फुलराणी’ मधील स्वगत, म्या बी शंकर हाय, या नाटिकेतील प्रवेशांचे सादरीकरण कविता वाचन प्रभावीपणे करण्यात आले.