नाशिक : कागदाचे विविध रंगांचे आकार आणि त्या आकारातून मनात दडलेल्या असंख्य मोरपंखी कलाकृती यांची अनोखी प्रचिती मुलांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑफ. बँक लि. नाशिक सारस्वत बँक लि., विश्वास ज्ञान प्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, रेडिओ विश्वास ९०.८ कम्युनिटी रेडिओ व विश्वास लॉन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ओरिगामी कार्यशाळेचे प्रा. हेमंत चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला व कल्पकतेला वाव देण्यासाठी मनोरंजक पध्दतीने सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले.
कागदापासून पंख हलवणारा पक्षी, सूर्यपक्षी, समारंभाप्रसंगीचा बॅच, होड्या, जहाज, मोर, ससा, सौरऊर्जा पंख, खुर्ची, टोपी, जेवणाचा डबा, फुलांचे विविध प्रकार अशा रोजच्या जगण्यातील वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिक करून उपस्थित मुलांकडून करून घेतले. ओरियामी कलेचा इतिहास मनोरंजनातून संदेश देणे हा असून हसत खेळत आनंदमयी जीवन जगण्यासाठी ह्या कलेचा उपयोग करावा असे श्री. चोपडे म्हणाले.
ओरियामी कला पर्यावरणपूरक असून कागदापासून पाहिजे तो आकार निर्माण करण्याचे कौशल्य यातून सहजरित्या करता येते. यासाठी सातत्य, सराव आवश्यक असून भूमितीय संकल्पना सोप्या पध्दतीने समजून देण्यासाठी ओरियामी कला उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
टि. व्ही. चॅनेल्सच्या जमान्यात हरवत चाललेल्या क्रिएटीव्हीटीला अशा शिबिरातून निश्चित दिशा मिळेल. मुलांमधील उपजत कला व कौशल्याचा वाव मिळवण्यासाठी याचा उपयोग होतो. अभ्यासाबरोबर एखादा जीवनात असावा त्यातून आनंद मिळत असतो. याप्रसंगी उपस्थित शिबिरार्थींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.