मराठी भाषा सध्या जगामध्ये नवव्या क्रमांकावर बोलली जाणारी भाषा आहे. आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या भूमीतील लोकांशी नाळ ज्या भाषेतून जोडली जाते, त्याच भाषेमध्ये लिहिले पाहिजे. त्यासाठी देशीपणा हा महत्त्वाचा आहे. आपले शब्द अशुद्ध असले तरी ते लिहिण्यासाठी वापरले पाहिजेत. आपण मराठीचे वैभव पुणे, मुंबईपुरते मर्यादित करून ठेवले आहे. मराठीची समृद्धी आपणच संकुचित करीत आहोत. मराठी भाषेसाठी आपण मुद्दाम जागतिक होण्याची गरज नाही. त्यासाठी सौंदर्यशास्त्र शिकण्याची गरज नाही. आपल्याकडे मुळात जे असते तेच खरे असते. कवी मुळातले बाहेर आणण्याचा प्रयत्न करीत असतो, असे प्रतिपादन ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहितत्यक भालचंद्र नेमाडे यांनी परिवर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
पुढे बोलतांना डॉ. नेमाडे म्हणाले की, कविता ही मुळातच मौखिक असते. आपल्याकडे दिड्या, भजने, लोकसाहित्याची परंपरा, बहुरूपी, सोंगे जात्यावरच्या ओव्या यामधून मराठी भाषा समृद्ध होत गेली आहे. बहिणाबाईच्या कवितांपासून ते ई बुकपर्यंत मराठी भाषेची मजल दरमजल होत गेली आहे. मराठीचे वैभव वाढले आहे. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार श्रीकांत देशमुख यांच्या सन्मान महोत्सवासाठी मराठी साहित्यिकांची मांदियाळी या निमित्ताने उपस्थित होती. यशवंतराव चव्हाण सेंटरची नांदेड शाखा, अभंग प्रकाशन, जळगाव येथील नाट्य क्षेत्रातील परिवर्तन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने या परिवर्तन सोहळ्याचे दोन दिवशीय आयोजन आयोजित करण्यात आले आहे.
या महोत्सवाचे उद्घाटन साहित्य अकादमी पुरस्कारासह ज्ञानपीठ हा सन्मान प्राप्त करणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक, 'कोसलाकार ' प्रा. डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मराठी ख्यातीकीर्त साहित्यिक वसंत आबाजी डहाके, डॉ. रंगनाथ पठारे, शब्दालय प्रकाशनच्या सुमती लांडे, प्रभाकर हरकळ, राहुल निबाळकर, नेहा पवार, अभंग पुस्तकालयाचे संजीव कुळकर्णी, शिवाजी गावंडे, शेषराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नाटककार दत्ता भगत हे होते. मान्यवरांचे स्वागत सुरेश जोंधळे, प्रा. डॉ. महेश मोरे, सौ. अपर्णा नेरलकर, श्रीराम गव्हाणे, सुजाता विठ्ठल, गोविंद जोशी, शिवाजी अंबुलगेकर, हर्षल पाटील यांनी केले. परिवर्तन महोत्सवाचे प्रास्ताविक अभंग पुस्तकालयाचे पत्रकार संजीव कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते व्यासपीठावर टाळ, मृदुंगाच्या गजरामध्ये, वारकऱ्यांच्या वेषामध्ये खांद्यावर पताका घेऊन दिंडीमध्ये पांडुरंगाचे भजन करून करण्यात आले.
उद्घाटनाच्या सत्रानंतर श्रीकांत देशमुख लिखित व योगेश पाटील दिग्दर्शित नली (निरपेक्ष प्रेमाची गोष्ट) या एकपात्री नाट्यप्रयोगाचे सादरीकरण हर्षल पाटील यांनी केले. तसेच महाराष्ट्रभर गाजत असलेला नाट्यप्रयोग 'अमृता साहिर इमरोज' सादर करण्यात आला. या नाटकाचे लेखन शंभू पाटील यांनी केले असून मंजुषा भिडे यांनी दिग्दर्शन केले आहे. या नाटकातील भूमिका कलावंत हर्षदा कोल्हटकर, सोनाली पाटील व शंभू पाटील यांनी आपल्या दमदार अभिनयाने नांदेडच्या प्रेक्षकांसमोर सादर केल्या. रसिक श्रोत्यांची वाहवा मिळविली. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. डॉ. विठ्ठल यांनी केले. श्रीराम गव्हाणे यांनी आभार मानले.